दणदणीत विजयानंतरही युवराज टीम इंडियावर संतापला

ेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी-२० मॅचमध्ये भारताचा दणदणीत विजय झाला

Updated: Dec 7, 2019, 12:48 PM IST
दणदणीत विजयानंतरही युवराज टीम इंडियावर संतापला title=
फोटो सौजन्य : बीसीसीआय

हैदराबाद : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी-२० मॅचमध्ये भारताचा दणदणीत विजय झाला आहे. विराट कोहलीच्या नाबाद ९४ रन आणि केएल राहुलच्या ६२ रनमुळे भारताने वेस्ट इंडिजने ठेवलेलं २०८ रनचं आव्हान १८.४ ओव्हरमध्ये पूर्ण केलं. भारताचा या मॅचमध्ये विजय झाला असला तरी युवराज सिंग मात्र टीम इंडियाच्या कामगिरीवर संतापला आहे.

या मॅचमध्ये टीम इंडियाची फिल्डिंग सुमार झाली. वॉशिंग्टन सुंदर आणि रोहित शर्मा यांनी प्रत्येकी दोन-दोन कॅच आणि केएल राहुलने एक कॅच सोडला. तर कर्णधार विराट कोहलीची फिल्डिंगही खराब झाली.

टीम इंडियाच्या या खराब फिल्डिंगवर युवराज सिंगने नाराजी जाहीर केली आहे. 'भारताने अतिशय खराब फिल्डिंग केली आहे. तरुण खेळाडू बॉल पकडायला उशीरा जात आहेत. जास्त क्रिकेट खेळण्यामुळे हे होत आहे का?' असा सवाल युवराजने उपस्थित केला.

वॉशिंग्टन सुंदरने शिमरन हेटमायरचा कॅच २ वेळा सोडला. १६व्या ओव्हरमध्ये सुंदरने ४४ रनवर हेटमायरचा कॅच सोडल्यामुळे त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० मधलं त्याचं पहिलं अर्धशतक पूर्ण केलं. याच ओव्हरमध्ये रोहितने कायरन पोलार्डचा २४ रनवर कॅच सोडला. पोलार्डने १९ बॉलमध्ये ३७ रनची खेळी केली. टीम इंडियाच्या या खराब फिल्डिंगमुळे वेस्ट इंडिजने २० ओव्हरमध्ये २०७/५ एवढा स्कोअर केला.

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने या मॅचमध्ये टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. शिमरन हेटमायरचं अर्धशतक आणि पोलार्ड जेसन होल्डर, दिनेश रामदीनने शेवटच्या काही ओव्हरमध्ये केलेल्या फटकेबाजीमुळे वेस्ट इंडिजला २० ओव्हरमध्ये २०७/५ पर्यंत मजल मारता आली. होल्डरने ९ बॉलमध्ये २४ रन आणि दिनेश रामदीनने ७ बॉलमध्ये ११ रनची खेळी केली. वेस्ट इंडिजने शेवटच्या ५ ओव्हरमध्ये ६३ रन केले.

भारताकडून युझवेंद्र चहलने सर्वाधिक २ विकेट घेतल्या, तर वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर आणि रवींद्र जडेजाला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली. वेस्ट इंडिजने ठेवलेल्या या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला सुरुवातीलाच रोहित शर्माच्या रुपात धक्का लागला. रोहित १० बॉलमध्ये ८ रन करुन आऊट झाला.

रोहितची विकेट गेल्यानंतर विराट आणि राहुलने इनिंगला आकार दिला. राहुल ४० बॉलमध्ये ६२ रन करुन आऊट झाला, तर विराट ५० बॉलमध्ये नाबाद ९४ खेळला. ऋषभ पंतने ९ बॉलमध्ये १८ रन केले, तर श्रेयस अय्यर ६ बॉलमध्ये ४ रन करुन माघारी परतला. 

३ टी-२० मॅचच्या सीरिजमध्ये भारत १-०ने आघाडीवर आहे. सीरिजची दुसरी टी-२० मॅच रविवारी खेळवण्यात येणार आहे. तर तिसरी आणि अखेरची मॅच मुंबईत ११ डिसेंबरला होणार आहे. टी-२० सीरिज झाल्यानंतर दोन्ही टीममध्ये ३ वनडे मॅचची सीरिजही खेळवली जाईल.