मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या T20I मालिकेतील दुसरा सामना कोलकात्याच्या मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने वेस्ट इंडिज संघाला विजयासाठी 187 धावांचे लक्ष्य दिले आहे. या सामन्यात वेंकटेश अय्यरने फलंदाजी करताना असा फटका मारला की युझवेंद्र चहल ड्रेसिंग रूममध्ये पडला.
व्यंकटेश अय्यरची शानदार फटकेबाजी
विराट कोहली बाद झाल्यानंतर भारतीय संघ अडचणीत दिसत होता, मात्र सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या व्यंकटेश अय्यरने शानदार फलंदाजीचा नमुना सादर केला. त्याची दमदार फलंदाजी पाहून विरोधी संघाच्या गोलंदाजांनी दाताखाली बोटे दाबली. डावाच्या 16व्या षटकात व्यंकटेश अय्यर फलंदाजी करत असताना शेल्डन कॉट्रेल गोलंदाजीला आला. तिसरा चेंडू कॉट्रेलने अय्यरच्या पायावर टाकला, त्यावर अय्यरने असा धारदार शॉट मारला की सर्वांचे लक्ष लागून राहिले.
चेंडू थेट भारतीय संघाच्या डग आऊटच्या दिशेने गेला, त्यामुळे तिथे बसलेले सर्व खेळाडू चेंडू टाळताना दिसले. दरम्यान, युझवेंद्र चहल यावेळी जरा धडपडला. आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
— Addicric (@addicric) February 18, 2022
व्यंकटेश अय्यरने या सामन्यात शानदार खेळी केली, त्याने 18 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 33 धावा केल्या. त्याने अखेरीस अतिशय आक्रमक खेळी खेळली. त्याने यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतसोबत 76 धावांची शानदार भागीदारी केली, ज्यामुळे भारताला 187 धावांपर्यंत मजल मारता आली.
दुसऱ्या T20 सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताकडून सुपरस्टार फलंदाज विराट कोहलीने शानदार अर्धशतक झळकावले आहे. कोहलीने मैदानात चौफेर फटके मारले. त्याने 41 चेंडूत 52 धावा केल्या. त्याच्याशिवाय कर्णधार रोहित शर्माही अतिशय धोकादायक लयीत दिसला, पण त्याला मोठी खेळी खेळता आली नाही. त्याने 19 धावा केल्या. वेस्ट इंडिजचा अष्टपैलू रोस्टन चेसने 3 विकेट घेतले.