सावधान! ...तर 2nd Hand Smartphone मुळे तुम्हाला होऊ शकतो 3 वर्षांचा तुरुंगवास

Buying Second Hand Smartphone: बरेचजण अपडेटेड राहण्यासाठी दरवर्षी नवीन स्मार्टफोन विकत घेताना दिसतात. अनेकदा हे नवीन मॉडेल असणारे स्मार्टफोन हे सेकेण्ड हॅण्ड असतात. मात्र हे असे सेकेण्ड हॅण्ड स्मार्टफोन त्या व्यक्तीला अडचणीत आणू शकतात. 

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 4, 2023, 12:23 PM IST
सावधान! ...तर 2nd Hand Smartphone मुळे तुम्हाला होऊ शकतो 3 वर्षांचा तुरुंगवास title=
अनेकजण हल्ली सेकेण्ड हॅण्ड स्मार्टफोन सहज विकत घेतात (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य रॉयटर्स)

Second Hand Smartphone Buying Tips: स्मार्टफोन आणि त्यातही प्रीमियम स्मार्टफोनची मागणी गेल्या काही काळात मोठ्या प्रमाणात वाढल्याचं चित्र दिसत आहे. अनेकदा आपला आवडता फोनचं नवीन मॉडेल विकत घ्यायला परवडत नाही म्हणून लोक सेकेण्ड हॅण्ड महागडे फोन (Second Hand Smartphone) विकत घेतात. पूर्वी सेकेण्ड हॅण्ड फोन विकत घेताना फार विचार केला जायचा. मात्र हल्ली दरवर्षी फोन बदलणारे अनेकजण असून ते अगदी सहज सेकेण्ड हॅण्ड फोन विकत घेऊन त्याची विक्री करत लेटेस्ट मॉडेलबरोबर अप-टू-डेट राहण्याचा प्रयत्न करतात. मात्र अशाप्रकारे सेकेण्ड हॅण्ड स्मार्टफोन विकत घेताना चुकून चोरीचा स्मार्टफोन विकत घेतला आणि यासंदर्भातील माहिती पोलिसांना मिळाली तर विकत घेणाऱ्या ग्राहच्या अडचणी वाढू शकतात. हा इतका गंभीर गुन्हा आहे की त्यासाठी 3 वर्षांची शिक्षा आणि आर्थिक दंड अशा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. 

3 वर्षांची शिक्षा आणि 1 लाखांचा दंड

सेकेण्ड हॅण्ड म्हणून चुकून चोरीचा फोन विकत घेतला तर पोलिस विकत घेणाऱ्या व्यक्तीचा माग सहज काढू शकतात. माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 मधील कलम 66(ब) अंतर्गत अशाप्रकारचा फोन बाळगणाऱ्या किंवा वापरणाऱ्या व्यक्तीला 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 1 लाख रुपयांपर्यंतचा आर्थिक दंडाची जास्तीत जास्त शिक्षा सुनावली जाऊ शकते. 

या गोष्टींची काळजी घ्या

एखादा महागडा सेकेण्ड हॅण्ड स्मार्टफोन विकत घ्यायचा असेल तर त्यासंदर्भातील संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. अशाप्रकारे सेकेण्ड हॅण्ड स्मार्टफोन ज्या व्यक्तीकडून विकत घेत आहात ती ओळखीची असावी असा प्रयत्न असू द्या. अगदी साध्या भाषेत सांगायचं झालं तर ओळखीच्या व्यक्तींकडूनच असे सेकेण्ड हॅण्ड फोन विकत घ्या. तसेच ऑनलाइन माध्यमातून रिसेलमध्ये स्मार्टफोन विकत घेत असाल तर फोनचं ओरिजन बिल फोन विकणाऱ्याकडून नक्की मागा. या व्यक्तीकडे थेट बील नसेल तर बीलचा फोटो असला तर तो घेऊन ठेवा. फोनचा व्यवहार 2016 नंतरचा असेल तर फोनच्या बिलावर जीएसटी नंबर असेल याची खात्री करुन घ्या. याचा अर्थ फोन हा कायदेशीर मार्गाने खरेदी करण्यात आला आहे असा होतो.

अनोळखी व्यक्तीकडून सेकेण्ड हॅण्ड स्मार्टफोन घेत असाल तर...

तसेच ऑनलाइन माध्यमातून अगदी अनोखळी व्यक्तीकडून सेकेण्ड हॅण्ड फोन घेत असाल तर त्या व्यक्तीचं ओळखपत्रं म्हणजेच आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्सचा फोटो नक्की मागवून घ्या. यामुळे तुम्हाला फोन नेमका कोणी विकला आहे हे ठाऊक असेल. भविष्यात हा फोन चोरीचा निघालाच तर तुम्हाला हे कागदपत्रं दाखवून फोन विक्रेत्याची माहिती पोलिसांना देता येईल.

फोन सुरु करतानाच पोलिसांना मिळते माहिती

फोन चोरीला गेल्यानंतर त्यासंदर्भातील तक्रार पोलिस स्टेशनला केली जाते. त्यानंतर पोलिस आयएमईआय क्रमांकाच्या मदतीने फोन ट्रेस करतात. हा चोरीला गेलेला फोन ऑन केल्यानंतर पोलिसांना या फोनचं लोकेशन समजतं. तसेच या फोनमध्ये कोणतं सीमकार्ड वापरलं जात आहे याचीही माहिती पोलिसांना मिळते. एखाद्याने असा एखादा चोरलेला फोन विकत घेतला असेल तर पोलिस सहज त्या व्यक्तीपर्यंत पोहचू शकतात.