Maruti च्या स्वस्त कारचा मार्केटमध्ये धुमाकूळ, धडाधड 30 लाख गाड्यांची विक्री

Maruti ने 24 वर्षांपूर्वी Wagon R ला घरगुती बाजाराच लाँच केलं होतं. त्यावेळी ही कार Hyundai Santro ला स्पर्धा देण्याच्या उद्देशाने बाजारात आणलं होतं. तेव्हापासून ही कार ग्राहकांच्या पसंतीस पडली असून, आजही तिला मिळणारा प्रतिसाद कायम आहे.   

शिवराज यादव | Updated: May 16, 2023, 03:42 PM IST
Maruti च्या स्वस्त कारचा मार्केटमध्ये धुमाकूळ, धडाधड 30 लाख गाड्यांची विक्री title=

मारुती सुझुकी (Maruti Suzuki) देशातील सर्वात मोठ्या कारनिर्मिती कंपनींपैकी एक आहे. कमी किंमती, चांगला मायलेज आणि कमी मेंटेनन्स असणाऱ्या कार यासाठी मारुती सुझुकीला ओळखलं जातं. कंपनीच्या अनेक गाड्यांनी बाजारात आपलं वर्चस्व गाजवलं आहे. आजही मार्केटमध्ये अनेक गाड्यांनी विक्रीच्या बाबतीत इतर ब्रँड्सना मागे टाकलं आहे. त्यातच कंपनीने कार विक्रीत आणखी एक रेकॉर्ड केला आहे. मारुती सुझुकीने जाहीर केलं आहे की, कंपनीने आपली प्रसिद्ध हॅचबॅक कार Maruti Wagon R च्या 30 लाखाहून अधिक युनिट्सची विक्री केली आहे. बाजाराज ज्या गाड्यांची सतत सर्वाधिक विक्री होत आहे, त्यात या गाडीही वरच्या क्रमांकावर आहे. 

Maruti Wagon R ला 'टॉल ब्वॉय' म्हणूनही ओळखलं जातं. मागील काही दशकांपासून ही गाडी बाजारात अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. या गाडीचं थर्ड जनरेशन मॉडेल सध्या मार्केटमध्ये उपलब्ध असून, आपल्या सेगमेंटमध्ये चांगलीच प्रसिद्ध आहे. सध्याच्या मॉडेलची किंमत 5 लाख 54 हजार पासून सुरु होते. ही कार पेट्रोल इंजिन आणि कंपनी फिटेड सीएनजी व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. 

मारुती सुझुकीने 18 डिसेंबर 1999 मध्ये Wagon R च्या फर्स्ट जनरेशन मॉडेलला घरगुती बाजाराच लाँच केलं होतं. त्यावेळी बाजारात मारुती ऑल्टो कार लाँच झालेली नव्हती आणि Maruti 800 चं वर्चस्व होतं. गेल्या 24 वर्षांपासून Maruti Wagon R बाजारात चांगली कामगिरी करत आहे. भारतात निर्मिती होणारी Maruti Wagon R ला बांगलादेश, भूतान, नेपाळ आणि श्रीलंकासहित अनेक शेजारी देशातही निर्यात केलं जातं. 

Maruti Wagon R ला कंपनीने त्यावेळी Hyundai Santro ला स्पर्धा देण्यासाठी बाजारात आणलं होतं. या गाडीमध्ये चांगला स्पेस असल्याने Maruti Wagon R देशात प्रचंड लोकप्रिय झाली. दूरच्या प्रवासासाठीही या कारला पसंती दिली जाते. तसंच यामध्ये पावर विंडो आणि पावर स्टेअरिंगसारखे अनेक फिचर्स मिळतात. 90 च्या दशकात हे फिचर्स फक्त लक्झरी आणि महागड्या गाड्यांमध्ये मिळत होत्या. 

सुरुवातीला या कारची विक्री धीम्या गतीने होत होती. 5 लाख युनिट्सचा आकडा पार करण्यासाठी कंपनीने तब्बल 9 वर्षं लागली होती. पण यानंतर फक्त 4 वर्षांत त्यांनी 5 लाख युनिट्सचा आकडा पार केला होता. 2012 मध्ये कंपनीने एकूण 10 लाख युनिट्सची विक्री केली. नंतर 2015 मध्ये 5 लाख, 2017 मघ्ये 5 लाख युनिट्स विकले गेले. 2021 पर्यंत मारुतीने 25 लाख युनिट्सची विक्री केली आहे. 

कंपनीने एप्रिल महिन्यात एकूण 20 हजार 879 युनिट्सची विक्री केली. Maruti Wagon R चं पेट्रोल व्हेरियंट 23.56 किमी आणि सीएनजी व्हेरियंट 34.05 किमीचा मायलेज देते. त्यांची किंमत 5.54 लाख आणि 7.42 लाख इतकी आहे.