Jio Platformsमध्ये अमेरिकन कंपनी Qualcommची कोट्यवधींची गुंतवणूक

जिओ प्लॅटफॉर्म आणि क्वालकॉम यांच्यातील हा करार जिओला देशात 5 जी पायाभूत सुविधा तयार करण्यात मदत करेल.

Updated: Jul 13, 2020, 06:33 PM IST
Jio Platformsमध्ये अमेरिकन कंपनी Qualcommची कोट्यवधींची गुंतवणूक title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये Jio Platforms अनेकांकडून गुंतवणूक करण्यात येत आहे. गेल्या 12 आठवड्यांमध्ये जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये 13 गुंतवणूक झाल्या आहेत. अमेरिकन कंपनी क्वालकॉम वेंचर्सने Qualcomm Ventures जिओमध्ये 0.15 टक्के भागभांडवलसाठी 730 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीची घोषणा केली आहे.

क्वालकॉम कंपनी त्यांच्या उत्कृष्ट वायरलेस तंत्रज्ञानासाठी जगभरात ओळखली जातो. क्वालकॉम वेंचर्सला गुंतवणूकीच्या बदल्याद जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये 0.15 टक्के इक्विटी हिस्सेदारी मिळणार आहे. 

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी सांगितलं की, 'क्वालकॉम बर्‍याच वर्षांपासून एक महत्त्वपूर्ण भागीदार आहे. भारतात एक मजबूत, सुरक्षित वायरलेस आणि डिजिटल नेटवर्क बनवण्याचं आणि डिजिटल कनेक्टिव्हिटीचे फायदे भारतातील प्रत्येकापर्यंत पोहचवण्याचा आमचा दृष्टीकोन आहे. क्वालकॉमला वायरलेस तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सखोल ज्ञान आहे. क्वालकॉमच्या या सखोल ज्ञानाचा उपयोग भारतात 5 जी तंत्रज्ञान आणि भारतात डिजिटल परिवर्तन करण्यास मदत करेल.'

क्वालकॉमच्या या गुंतवणूकीसह रियालन्स जिओ प्लॅटफॉर्म्सची एकूण गुंतवणूक 118,318.45 कोटी रुपये होईल. जिओ प्लॅटफॉर्म आणि क्वालकॉम यांच्यातील हा करार जिओला देशात 5 जी पायाभूत सुविधा तयार करण्यात मदत करेल.

क्वालकॉमआधी जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये 22 एप्रिल रोजी फेसबुकने गुंतवणूक केली. त्यानंतर सिल्वर लेक, विस्टा इक्विटी, जनरल अटलांटिक, केकेआर, मुबाडला, सिल्वर लेक, अबू धाबी इन्वेस्टमेंट अथॉरिटी ( ADIA), TPG, एल कॅटरटन, PIF आणि इंटेलनेही गुंतवणूक केली आहे. यापैकी अनेक कंपन्या अमेरिकेतील आहेत. क्वालकॉमने याआधी भारतात डेअरी, डिफेन्स, ट्रान्सपोर्टेशन यांसारख्या इतरही सेक्टरमध्ये गुंतवणूक केली आहे.