नवी दिल्ली : बाईकप्रेमींसाठी एक महत्वाची बातमी आहे. जर तुम्ही बाईक खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. भारतातील प्रसिद्ध दुचाकी कंपनी बजाज ऑटोने आपल्या बाईक्सच्या किंमतीत वाढ केली आहे. पाहूयात कुठल्या बाईकच्या किंमतीत किती रुपयांनी वाढ झाली आहे.
बजाज ऑटोने पल्सर RS 200, V15, डिस्कवर 125 आणि प्लॅटिना रेन्जच्या बाईकच्या किमतीत वाढ केली आहे. मात्र, बजाज डोमिनोरच्या किंमतीत सर्वाधिक वाढ करण्यात आली आहे.
बजाज डोमिनोरच्या किंमतीत 2,000 रुपयांनी वाढ झाली आहे. डोमिनरच्या ABS व्हेरिएंटची किंमत आता दिल्लीत 1,58,275 रुपये (एक्स शोरुम) झाली आहे. तर, नॉन एबीएस व्हेरिएंटची किंमत 1,42,113 रुपये झाली आहे.
बजाजने आपली पल्सर RS 200 बाईकच्या किंमतीत 1,800 रुपयांनी वाढ केली आहे. याच्या ABS व्हेरिएंटची किंमत दिल्लीत 1,36,794 रुपये आणि नॉन-एबीएस व्हेरिएंटची किंमत 1,24,890 रुपये झाली आहे. मात्र, पल्सर NS 160 च्या किंमतीत कुठलेही बदल करण्यात आले नाहीयेत. तर, पल्सर 220F आणि पल्सर 180 च्या किंमतीत 1,000 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. या दोन्ही बाईक्सची किंमत आता क्रमश: 94,682 रुपये आणि 82,650 रुपये झाली आहे.
बजाजने पल्सर NS 200 च्या किंमतीत 1,700 रुपयांनी वाढ केली आहे आणि याच्या नॉन-एबीएस व्हेरिएंटसाठी आता 98,714 रुपये तर, एबीएस व्हेरिएंटसाठी 1,10,714 रुपये मोजावे लागणार आहेत.
बजाज अॅव्हेंजर 220 च्या किंमतीत 1,000 रुपयांपर्यंत वाढ केली आहे त्यामुळे याची किंमत 94,464 रुपये झाली आहे. तर, अॅव्हेंजर 180 च्या किंमतीत 1,100 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे त्यामुळे या गाडीची किंमत आता 84,346 रुपये झाली आहे.