मुंबई : नोकरीत अमुक एक गोष्ट नाही, तमुक सुविधा नाही असं म्हणत किंवा एखादी चांगली संधी चालून आली अथवा काहीतरी नवं करण्याचा निर्णय घेतला, की वेळ येते ती म्हणजे सध्या करत असणाऱ्या नोकरीला रामराम ठोकण्याची.
प्रत्येकाच्याच आयुष्यात हा टप्पा एकदातरी येतो. कोणी नोकरी सोडत असेल तर चर्चा होतेच. पण, तुम्ही कधी कोणा व्यक्तीनं नोकरी सोडल्याची चर्चा संपूर्ण जगभरात झालेली पाहिलीये?
नसेल, तर हरकत नाही. कारण, आता तुम्ही अशा एका व्यक्तीची चर्चा पाहत असाल, जिनं नोकरी सोडली आणि तिच्याच नावाचा बोलबाला संपूर्ण जगात झाला.
या महिलेचं नाव आहे, शेरिल सँडबर्ग. फेसबुकची मालकी असलेल्या ‘मेटा’मध्ये सीओओ या पदावरून राजीनामा दिला.
‘स्टार्टअप’च्या स्वरूपातील या व्यवसायाचे डिजिटल जाहिरातीच्या साम्राज्यात रूपांतर करण्याचं श्रेय शेरिलला जातं. ‘फेसबुक’ या बडय़ा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सँडबर्गनं चीफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून 14 वर्षे काम केलं. 2008 पासून ती या कंपनीशी जोडली गेली होती.
आता मात्र आयुष्यात एक नवा अध्याय लिहिण्याची वेळ आल्याचं तिनं फेसबूक पोस्टद्वारे सांगितलं. येत्या काळात ती समाजहिताच्या कामात हातभार लावणार आहे.
शेरिलनं तिच्या पदाचा राजीनामा दिला असला तरीही ती फेसबुकशी कायमच जोडलेली असेल असं मार्क फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यानं ( Facebook CEO Mark Zuckerberg ) सांगितलं. ती फेसबुकच्या संचालक मंडळाचा एक भाग असेल. तर, तिच्याऐवजी या पदावर जेवियर ऑलिव्हन ( Facebook's new COO Javier Oliven ) यांची नियुक्ती करण्यात येईल.