मुंबई : महाश्वेता देवी म्हटले की, आठवतो तो त्यांनी सांहित्य आणि कलेच्या माध्यमातून बुलंद केलेला उपेक्षितांचा आवाज. आज त्यांचा ९२वा वाढदिवस. त्यांच्या जयंती निमीत्त गुगलनेही त्यांच्यावर एक शानदार डूडल बनवले आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहीली.
गुगलने बनविलेले डूडल पाहून आज पुन्हा एकदा महाश्वेता देवी यांच्या व्यक्तिमत्त्वाची, त्यांच्या संघर्षाची आणि साहित्याची चर्चा सुरू झाली. महाश्वेता देवी यांचा जन्म १९२६मध्ये ढाका येथे झाला. खरेतर साहित्य, कला आणि संघर्ष याची प्रेरणा महाश्वेतादेविंना जन्मापासूनच मिळाली. सुप्रसिद्ध कवी आणि कादंबरिकार मनीष घट हे त्यांचे वडील. त्यांचे कल्लोल आंदोलनाशीही घनिष्ट संबंध होते. त्यांचे बंधू ऋत्विक घट हे सुद्धा मोठे चित्रपट निर्माते आणि चित्रपट सृष्टीतील नावाजलेले नाव होते.
१९३६ ते १९३८ या काळात महाश्वेता देवी यांनी शांतिनिकेतनमधून शिक्षण घेतले. तेथे त्यांनी बीए आणि इंग्रजीत एमए केले. दरम्यानच्या काळात महाश्वेता देवी यांची लेखणी बहरत होती. त्या केवळ उत्कृष्ट लेखिकाच नव्हे तर, आदिवासी आणि उपेक्षितांचा आवाजही होत्या. त्यांनी या समाजासाठी मोठे काम केले. त्यांना साहित्य अकादमी आमि ज्ञानपीठ पुरस्कारानेही गौरिविण्यात आले आहे.
महाश्वेता देवी यांचे लिखान साहित्य वर्तुळात तर, प्रसिद्ध होतेच. पण, त्यांच्या साहित्याची दखल बॉलिवूडनेही घेतली. संघर्ष (१९६८) हा दिलिप कुमार आणि वैजंयंतीमाला यांचा हा चित्रपट महाश्वेता देवी यांच्या 'लायली असमानेर आयना' या कथेवर अधारीत आहे. चित्रपट आणि त्यातील गाणी विशेष लोकप्रिय ठरली. या चित्रपटातील“मेरे पैरों में घुंघरू पहना दो...” हे गाणे प्रचंड हिट ठरले. सुप्रसिद्ध दिग्दर्शक हरनाम सिंह यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.
रूदाली (१९९३) हा एक त्यांचा असाच गाजलेला चित्रपट. डिंपल कपाडीयाची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच, डिपलला या चित्रपटातील अभिनयासाठी उत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कारही मिळाला होता. हा चित्रपट राजस्थानातील रडणाऱ्या महिलांवर अधारीत आहे. हा चित्रपटही महाश्वेता देवी यांच्या कथेवर अधारीत होता. जो कल्पना लाजिमी यांनी दिग्दर्शीत केला होता.
हजार चौरासी की मां (१९९८) हा चित्रपटही महाश्वेता देवी यांच्याच कथेवर अधारीत आहे. जो चित्रपट कथेच्याच नावाने प्रसारित झाला. जया बच्चन यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका केली आहे. गोविंद निहलानींचे दिग्दर्शन लाभलेल्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.