Coronavirusच्या नावाने यूजर्सच्या खासगी डेटावर हॅकर्सची नजर

हॅकर्सकडून डेटा लीक न होण्यासाठी अशी घ्या काळजी - 

Updated: Feb 9, 2020, 04:11 PM IST
Coronavirusच्या नावाने यूजर्सच्या खासगी डेटावर हॅकर्सची नजर
फाईल फोटो

नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसची दहशत माजली आहे. कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत ६००हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. चीनमधून सुरु झालेला हा व्हायरस आता अनेक देशांपर्यंत पोहचला आहे. यापासून बचाव होण्यासाठी अनेक लोक विविध प्रकारचे उपाय इंटरनेटवर सर्च करत आहेत. पण कोरोना व्हायरससोबतच आता हॅकर्सचाही मोठा धोका निर्माण झाला आहे.

'सायबर सिक्युरिटी फर्म कॅस्परस्काय'ने (Kaspersky) दिलेल्या रिपोर्टनुसार, कोरोना व्हायरसच्या धोक्याचा सर्वाधिक फायदा हॅकर्स उठवत आहेत. या खतरनाक व्हायरसची लक्षण आणि त्यापासून बचाव होण्यासाठी विविध प्रकारचे उपाय इंटरनेटवर शोधत असणाऱ्या लोकांवर या हॅकर्सची नजर आहे.

कॅस्परस्कायच्या संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, हॅकर्सकडून लोकांना या व्हायरससंबंधी माहिती आणि सेफ्टी टिप्सच्या नावाने खतरनाक फाईल्स यूजर्सच्या कंप्युटरपर्यंत पोहचवून, यूजरचा खासगी डेटा चोरण्यात येत आहे. संशोधकांना कोरोना व्हायरसच्या पीडीएफ, एमपी ४ आणि डॉक्स फाईलमध्ये लपलेल्या फाईल्स मिळाल्या आहेत.

हॅकर्सचा दावा - 

हॅकर्सद्वारे पाठवण्यात आलेल्या या फाईल्समध्ये दावा करण्यात आला आहे की, या फाईल्समध्ये व्हायरसपासून वाचण्यासाठी व्हिडिओ देण्यात आले आहे. त्यात कोरोना व्हायरसबाबत लेटेस्ट अपडेट आणि त्याची ओळख करण्याचे उपाय सांगण्यात आले आहेत. 

कॅस्परस्कायचे मालवेयर एनालिस्ट एनटॉन इवानॉव यांनी सांगितलं की, अशा १० फाईल्सचा शोध लावला आहे की, ज्यात अतिशय खतरनाक ट्रोजन व्हायरस आहे. हा व्हायरस यूजरच्या, डेटाला नुकसान पोहचवण्यासाठी, ब्लॉक करण्यासाठी, मॉडिफाय आणि कॉपी करण्यासह कंप्यूटर नेटवर्क आणि ऑपरेशनमध्ये बदल करु शकतो.

कोणत्याही लिंकवर क्लिक करु नका - 

कॅस्परस्कायने यूजर्सना सावधगिरी बाळगण्याबाबत सांगितलं आहे. अशा प्रकारच्या व्हायरस असलेल्या फाईल्सपासून वाचण्यासाठी कोणत्याही अनोळखी किंवा संवेदनशील लिंकवर क्लिक करु नये. लिंकच्या फाईल एक्सटेंशनवर लक्ष द्या. कोणतीही फाईल किंवा व्हिडिओ .exe किंवा .Ink फॉर्मेटमध्ये नसतात. अशाप्रकारच्या कोणत्याही लिंक ओपन न करण्याचं सांगण्यात येत आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) वेबसाईटवरुन माहिती घ्या - 

कोरोना व्हायरसबाबत कोणत्याही माहितीसाठी WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेच्या वेबसाईटवरुन माहिती घेता येऊ शकते. जागतिक आरोग्य संघटनेच्या वेबसाईटवर, ट्विटरवर या व्हायरसबाबत सुरक्षिततेचे उपाय, बातम्या, रिसोर्ससह अनेक अपडेट्स देण्यात आले आहेत. या वेबसाईटवर लोकांना कोरोना व्हायरसबाबत माहिती मिळणार असून त्यांना चुकीच्या लिंक आणि अफवांपासूनही दूर राहण्यास मदत होईल.