Income Tax विभागाकडून तुम्हालाही असा मेसेज आलाय? मुंबई पोलिसांकडून सावधानतेचा इशारा

Income Tax Department Message: मुंबई पोलिसांनी हा मेसेज नेमका कसा असतो यासंदर्भातील एक फोटो शेअर करत याबद्दलचा इशारा दिला आहे. सावध राहण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 26, 2024, 09:55 AM IST
Income Tax विभागाकडून तुम्हालाही असा मेसेज आलाय? मुंबई पोलिसांकडून सावधानतेचा इशारा title=
पोलिसांनी शेअर केला मेसेजचा नमुना (प्रातिनिधिक फोटो)

Income Tax Department Message: आयकर परतावा भरण्यासाची शेवटची तारीख अगदी काही दिवसांवर आली आहे. 31 जुलैपर्यंत आयकर परतावा भरण्यासाठी अनेकांच्या इनकमटॅक्सच्या साईटवर उड्या पडत आहेत. तर दुसरीकडे आधीच आयकर परतावा भरलेल्यांना परतावा मिळूही लागला आहे. अशातच आता आयकर विभागाच्या नावाने आर्थिक फसवणूकीचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळेच थेट मुंबई पोलिसांनीच यासंदर्भात सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

मुंबई पोलिसांनी दिला इशारा

मुंबई पोलिसांनी एका पोस्टमधून आयकर विभागाच्या नावाखाली फसवणूक केली जात असल्याचा इशारा दिला आहे. 'हे 'कर्’म करू नका!' अशा युनिक पद्धतीची पोस्ट करत मुंबई पोलिसांनी हा इशारा दिला आहे. फोटो शेअर करताना मुंबई पोलिसांनी, "तुमच्या एका क्लिकमुळे तुमच्या उत्पन्नाची वजाबाकी होऊ शकते. म्हणूनच अनोळखी लिंकवर क्लिक करण्यापूर्वी सावध रहा आणि सुरक्षित रहा," असं सांगितलं आहे.

काय असतं मेसेजमध्ये?

मुंबई पोलिसांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये करदात्यांना पाठवलेल्या मेसेजसारखाचा मेसेज ऑनलाइन माध्यमातून आर्थिक फसवणाऱ्या व्यक्ती पाठवतात असं सूचित केलं आहे. या फोटोमधील मेसेजमध्ये आयकर विभागाकडून आर्थिक वर्ष 2022-2023 साठी तुमचा आयकर परतावा म्हणून 17 हजार 490 रुपये परत करण्यात येणार आहे, असं सांगितलं जातं. तसेच करदात्याचा अकाऊंट नंबरचे शेवटचे चार डिजीटही दिले जातात. मात्र हा क्रमांक खरा नसतो. तसेच हा क्रमांक चुकीचा असेल तर पुढील लिंकवर क्लिक करुन तुमच्या बँकेसंदर्भातील डिटेल्स अपडेट करा, असं सांगितलं जातं. मात्र हे असले मेसेज फसवे असल्याचा इशारा पोलिसांना दिला आहे.

नक्की वाचा >> अनेक वर्षांपासूनची भारतीयांची 'ती' मागणी Google कडून मान्य; मिळणार मोठा दिलासा! याच आठवड्यात..

बसू शकतो आर्थिक फटका

अशा फसवण्या मेसेजच्या माध्यमातून येणाऱ्या लिंकद्वारे आयकर विभागासारख्याच दिसणाऱ्या साईट्सवर किंवा अन्य प्लॅटफॉर्मवरुन बँक खात्यांची माहिती घेऊन आर्थिक गंडा घातला जातो. 17 हजारांच्या आयकर परताव्याच्या नादात लाखो रुपयांचा फटका बसू शकतो. 

अशाप्रकारच्या फसवणुकीचे प्रकार वाढले

अशाप्रकारे आयकर परतावा भरण्याच्या कालावधीमध्ये तसेच त्यानंतरच्या काही महिन्यांमध्ये इनकम टॅक्स रिटर्नसच्या नावाखाली फसवणूक करण्याचं प्रमाण मागील काही वर्षांमध्ये वाढलेलं आहे. त्यामुळेच अशाप्रकारे कोणत्याही लिंकवर क्लिक करुन आपल्या आर्थिक व्यवहारांसंदर्भातील बँक खाती आणि इतर तपशील देऊ नये. सामान्यपणे मध्यमवयीन किंवा वयस्कर लोकांना पटकन या मेसेजमधील फेरफार कळत नाही आणि त्यांची फसवणूक होण्याची शक्यता अधिक असते. असं काही झाल्यास तातडीने सायबर पोलिसांकडे तक्रार करावी. स्थानिक पोलीस स्थानकामध्येही सायबर गुन्ह्यांसंदर्भातील तक्रार करता येते.