मुंबई: पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती पाहता लोकांचा कल आता इलेक्ट्रिक वाहन खरेदीकडे आहे. गेल्या काही दिवसात इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीत वाढ झाली आहे. त्यात इलेक्ट्रिक बाइक आणि स्कूटरच्या मागणीत दुप्पटीने वाढ झाली आहे. पण पावसाळ्यात दुचाकीववरून प्रवास करणं कठीण होतं. ही अडचण लक्षात घेऊन निंबस कंपनीने छत असलेली तीन चाकी बाजारात आणली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मिशिगन-आधारित इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअप, निंबसने नुकतेच एक प्रोटोटाइप वाहन 'निंबस वन' लाँच केले आहे. ही तीन चाकी इलेक्ट्रिक वाहन आहे. यात कारच्या कारची सुरक्षिततेसह बाइकचा आनंद लुटता येणार आहे.
'निंबस वन' वाहन 2.75 फूट रुंद आणि 7.5 फूट लांब आहे. ही गाडी कॉम्पॅक्ट कारपेक्षा तीन ते पाच पट लहान आहे. व्यस्त शहरी रस्त्यांसाठी चांगला पर्याय असून कमी जागेत पार्किंग शक्य आहे. यामध्ये मागच्या बाजूला दुसऱ्या प्रवाशाला बसण्याची सोय करण्यात आली आहे. यासोबतच सामान ठेवण्याची सुविधाही देण्यात आली आहे.
अमेरिकेत निंबस वनची गणना ऑटो-सायकलमध्ये
अमेरिकेत निंबस वनचं वर्गीकरण ऑटो-सायकल म्हणून करण्यात आले आहे. याचा अर्थ असा की, बाइक आणि कार या दोन्ही ठिकाणी ती सर्वोत्तम आहे. यासाठी स्वतंत्र मोटारसायकल परवाना आवश्यक नाही. कारचा परवाना असलेला कोणीही वाहन चालवू शकते आणि त्यांना हेल्मेट घालण्याचीही गरज नाही.
एका चार्जवर 93 मैल अंतर कापणार
निंबस वन सिटी ड्रायव्हिंगसाठी तयार केली गेली आहे. त्याचा टॉप स्पीड 50 mph आहे. कंपनीच्या मते, त्याच्या 9 kWh बॅटरीमुळे 93 मैलांचे अंतर सहज पार करू शकते. बॅटरी लेव्हल 2 चार्जरवर 1.2 तासांमध्ये आणि होम पॉवरवर 5.4 तासांमध्ये चार्ज होते. बॅटरी वाहनापासून वेगळी केली जाऊ शकते, याचा फायदा म्हणजे बॅटरी घरी नेऊनही चार्ज करता येते.
उत्तम वैशिष्ट्ये दिली आहेत
निंबस वनच्या मिनिमलिस्ट इंटीरियरमध्ये डिस्प्ले स्क्रीन, ब्लूटूथ-कनेक्टेड स्पीकर, पॉवर विंडो, एक वेगवान फोन चार्जर, हीटिंग आणि पर्यायी एअर कंडीशनिंगचा समावेश आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, वाहन ठोकू नये यासाठी वाहनात पुढे सेन्सर देण्यात आला आहे.
पुढील वर्षापासून वितरण
निंबस वनच्या प्री-ऑर्डर सुरू झाल्या आहेत. महिन्याभरात ग्राहकांना टेस्ट ड्राइव्ह देण्यात येईल. कंपनी प्रति ऑर्डर 100 डॉलर (सुमारे 7,769 रुपये) डाउन पेमेंट घेत आहे. संपूर्णपणे खरेदी करण्यासाठी वाहनांची किंमत सुमारे 9,980 डॉलर (रु. 7,75,441) असेल. निंबस वनची 2023 च्या तिसऱ्या तिमाहीत पहिली डिलिव्हरी होईल, अशी अपेक्षा आहे.