ई-कचऱ्यापासून तयार होतंय ऑलिम्पिक पदक

ही तंत्रज्ञान अनेकांना विचार करण्यास भाग पाडेल.

Updated: Feb 11, 2019, 05:39 PM IST
ई-कचऱ्यापासून तयार होतंय ऑलिम्पिक पदक  title=

नवी दिल्ली : जपान हा सध्याच्या घडीला तंत्रज्ञान क्षेत्रात अव्वल स्थानी असलेला देश आहे. जपानची राजधानी 'टोकियो' येथे २०२० मध्ये 'ऑलिम्पिक' स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत जपान अनोख्या तंत्रज्ञानाचा वापर करताना दिसणार आहे. ही तंत्रज्ञान अनेकांना विचार करण्यास भाग पाडेल. जपान हा देश 'टाकाऊपासून टिकाऊ' या मोहिमेला प्रोत्सान देत 'ऑलिम्पिक'मध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. यावेळी 'ऑलिम्पिक'मधील पदकांची निर्मिती करण्यासाठी 'जपान' टाकाऊ वस्तूंचा वापर करणार आहे. 

२०२० साली जुलै ते ऑगस्ट या महिन्यात टोकियो येथे 'ऑलिम्पिक'चे आयोजन करण्यात येणार आहे. या 'ऑलिम्पिक'मध्ये प्रदूषणाला आळा घालण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. म्हणूनच, येत्या 'ऑलिम्पिक' स्पर्धेत १६ टक्के प्रदूषण कमी करण्याच्या हेतूने जपान स्पर्धेत सहभागी होणार आहे. 'जपान टूडे'च्या वृत्तानुसार, जपानमध्ये २०१७ पासून 'राष्ट्रव्यापी' प्रोजेक्ट सुरु करण्यात आला आहे. 'राष्ट्रव्यापी' प्रोजेक्टनुसार, 'ई-वेस्ट' अर्थात ई-कचरा जमा करायला सुरुवात झाली आहे. 

जपान देशाने एक उपक्रम राबवला होता. त्यामध्ये देशवासियांना त्यांच्याकडे असणारी इलेक्ट्रॉनिक वस्तू देण्याची विनंती केली होती. त्यामुळे लोकांनी वापरात नसलेल्या स्मार्टफोन, डिजिटल प्रोडक्ट, लॅपटॉप, कॅमेरासारख्या गोष्टीचे दान केले. जपानमध्ये गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ४७,४८८ टन निरुपयोगी उपकरणे गोळा केले होते.

तसेच १८ महिन्यांमध्ये ५० हजार टन 'ई-वेस्ट' जमा करण्यात आला आहे. रिओ ऑलिम्पिकमध्येही पुनर्निर्मितीद्वारे वापरल्या जाणाऱ्या धातूचा वापर केला होता. ज्यामध्ये ३० टक्के चांदी आणि कांस्य प्राप्त झाले होते. २०२० च्या 'ऑलिम्पिक' स्पर्धेच्यावेळी प्रदूषण कमी करण्यासाठी एकूण २९ हजार करोड रुपये खर्च करण्यात येणार आहे. त्यामुळे 'ऑलिम्पिक'चे स्टेडियम तयार करण्यासाठी ८७ टक्के लाकडी गोष्टींचा वापर करण्यात येणार आहे.