Maruti Suzuki Hatchback cars: देशात मारुती सुझुकीच्या गाड्यांना सर्वाधिक पसंती मिळत आहे. कारण गेल्या काही महिन्यात कंपनीच्या गाड्यांची मागणी वाढत आहे. कंपनीचे लक्ष ग्रामीण आणि उपनगरी भागातील ग्राहकांवर आहे. मारुती सुझुकी प्रथमच कार खरेदी करणाऱ्यांवर लक्ष केंद्रित करत आहे. असं असताना तुम्ही पहिल्यांदा कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर योग्य पर्याय निवडणं आवश्यक आहे. छोट्या हॅचबॅक कार पहिल्यांदा कार खरेदी करणाऱ्यांसाठी योग्य ठरतील, असं कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं आहे. एकूणच देशांतर्गत प्रवासी वाहनांचा बाजारपेठेतील वाटा कमी होत असतानाही छोट्या कारची विक्री वाढतच राहील अशी कंपनीची अपेक्षा आहे.
मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे वरिष्ठ कार्यकारी संचालक (मार्केटिंग आणि विक्री) शशांक श्रीवास्तव म्हणाले, "आमचा विश्वास आहे की छोट्या कारची एकूण विक्री संख्या वाढेल." एकूण प्रवासी वाहनांच्या बाजारपेठेत हॅचबॅकचा वाटा सुमारे 45-46 टक्के होता. परंतु गेल्या वर्षी 38 टक्क्यांवर आला. दुसरीकडे एसयूव्हीचा वाटा 40 टक्क्यांपर्यंत वाढला आणि सर्वात जास्त विक्री होणारा विभाग बनला.
एमएसआयएलला छोट्या कार विभागात तेजीची अपेक्षा का आहे, असे विचारले असता श्रीवास्तव म्हणाले की, "भविष्यात भारताच्या आर्थिक वाढीबरोबरच वाहतुकीच्या गरजाही वाढतील. पहिल्यांदाच कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठी असेल. जर तुम्ही पहिल्यांदा कार खरेदी करत असाल तर याचा अर्थ हॅचबॅकची मागणी कायम राहील."