Tesla Electric Cars Factory In India: भारतामध्ये टेस्लाच्या इलेक्ट्रिक कार्स (Tesla Electric Cars) दाखल होणार असल्याची चर्चा मागील बऱ्याच काळापासून सुरु आहे. दरवेळेस काहीतरी नवीन बातमी येते आणि या चर्चांना उधाण येतं. मागील काही महिन्यांपासून टेस्लाचे अधिकारी भारतीय अधिकाऱ्यांशी चर्चा करत असल्याचेही समजते. भारतामध्ये टेस्लाच्या कारनिर्मितीचा कारखाना सुरु करण्यापासून ते इम्पोर्टेड कार भारतात असेम्बल करण्यापर्यंत कंपनीचा विचार असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. मात्र या सर्व गोष्टी केवळ चर्चा स्तरावरच राहिल्या आहेत. भारतामध्ये अमेरिकेप्रमाणेच टेस्लाच्या कार दिसतील हे भारतीय कारप्रेमींचं स्वप्न लवकर पूर्ण होईल असं वाटत नाही इथपर्यंतच्या प्रतिक्रियाही समोर आल्या. मात्र आता भारतीयांची ही प्रतिक्षा लवकरच संपणार असल्याचं चित्र दिसत आहे.
टेस्लाच्या भारतामधील एन्ट्रीसंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. एलन मस्क यांच्या टीमने भारत सरकारबरोबर कंपनीच्या भारतातील उद्योगविस्तारासंदर्भात चर्चा सुरु केल्याचं समजतं. विशेष म्हणजे मस्क आणि पंतप्रधान मोदी मागील महिन्यातच अमेरिकेत प्रत्यक्षात भेटले होते. या भेटीनंतर आपण मोदींचे चाहते झाल्याचं मस्कने म्हटलं होतं. या भेटीनंतर आता ही बातमी समोर येत असल्याने टेस्लाने नव्याने सुरु केलेल्या या चर्चेचा या भेटीशी काही संबंध आहे का अशी चर्चाही सुरु झाली आहे. भारत सरकारबरोबरच्या यंदाच्या चर्चेसाठी टेस्लाच्या अधिकाऱ्यांनी पूर्ण प्रस्तावच सादर केल्याचं समजतं. कंपनीने 5 लाख कार्सची निर्मिती करता येईल असा कारखाना उभारण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला दिला आहे. तसेच कंपनीने टेस्लाच्या कार या भारतीय बाजारपेठेमध्ये उतरवताना किंमतीसंदर्भातही महत्त्वाची माहिती दिली आहे. भारतामधील टेस्लाच्या कार्स या भारतीय ग्राहकांना परवडतील अशा किंमतीमध्येच उपलब्ध करुन देण्याचा टेस्लाचा मानस आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टेस्लाने भारत सरकारला दिलेल्या आपल्या प्रस्तावामध्ये, प्रत्येक वर्षी भारतामध्ये 5 लाख इलेक्ट्रीक कार्स तयार करण्याबरोबरच ही कार भारतामध्ये केवल 20 लाखांना लॉन्च करणार असल्याचंही सांगितलं आहे. अर्थात 20 लाख ही टेस्लाच्या कारची बेस प्राइज असणार आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार सध्या चीनमधील वाहन बाजारपेठेत टेस्लाचा चांगला दबदबा निर्माण झाला आहे. मात्र आता भारत हा कार उद्योगासाठी एक नवीन बाजारपेठ असून भारतात चांगला प्रतिसाद आपल्या कार्सला मिळू शकतो आणि हा उत्तम निर्यातीचा पर्याय ठरु शकतो असा कंपनीचा अंदाज आहे. भारतात कारखाना स्थापन केल्यास इंडो पॅसिफिक क्षेत्रातील देशांमध्ये आपल्या कार्स सहज आणि कमी खर्चात निर्यात करता येईल असं कंपनीला वाटत आहे.
सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टेस्ला यंदा खरोखरच उत्तम प्रस्तावासहीत सरकारशी चर्चेसाठी आली आहे. यंदाच्या चर्चेतून नक्कीच काहीतरी सकारात्मक निघेल असा विश्वास सरकारी सूत्रांनी व्यक्त केला आहे. स्थानिक स्तरावर निर्मिती आणि निर्यात या दोन मुद्द्यांचा विचार करता यंदा हे डील होईल अशी शक्यता अधिक आहे. कंपनी सध्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाशी चर्चा करत आहे. यंदाच्या चर्चेतून दोन्ही बाजूंचं एकमत होऊन नक्कीच काहीतरी सकारात्मक मार्ग निघेल असं सांगितलं जात आहे. मात्र या चर्चेसंदर्भात टेस्ला कंपनी आणि भारत सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.