नवी दिल्ली : भारताने चीनविरोधात मोठं पाऊल उचललं असून, भारतात चीनच्या 59 ऍप्सवर बंदी घालण्यात आली आहे. या ऍप्सवर बंदी घातल्यानंतर टिकटॉकची TikTok पॅरेंट कंपनी बाईटडान्सला ByteDance मोठं नुकसान होऊ शकत असल्याची बाब समोर आली आहे. चीनी सरकारचं मुखपत्र मानल्या जाणाऱ्या द ग्लोबल टाईम्सने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
भारताने चीनी ऍप्सवर बंदी घातल्यामुळे बाईटडान्स कंपनीला 6 अब्ज डॉलर्सचं नुकसान होऊ शकतं, अशी माहिती समोर आली आहे. द ग्लोबल टाईम्सने याबाबत ट्विट केलं आहे. द ग्लोबल टाईम्सने अधिकृत ट्विटरवरुन पोस्ट केलं आहे की, भारत सरकारकडून टिकटॉकसह 59 चीनी ऍप्सवर बंदी घालण्यात आल्यानंतर TikTokची पॅरेंट कंपनी ByteDanceला 6 अब्ज डॉलर्सचं नुकसान होऊ शकतं. ही बंदी सीमेवर भारत-चीन सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षानंतर घालण्यात आली आहे.
चीनी ऍप्सवरील बंदीबाबत बोलताना भारतीय आयटी मंत्रालयाने सांगितलं की, भारताची सुरक्षा, भारतातील लोकांचा डेटा आणि गोपनीयतेच्या संरक्षणासाठी, भारतीय सायबर स्पेसची सुरक्षा आणि सार्वभौमत्व सुनिश्चित करण्यासाठी हे एक पाऊल उचललं गेलं आहे.
भारतात 59 चीनी ऍप्सवर बंदी घालण्यात आली आहे. त्यात UC Browser, Tik Tok, SHAREit, Baidu map, Shein, King of Clash, Kings, DU Battery saver, Helo, Likee, YouCam makeup, Mi Community, CM Browsers, Virus Cleaner, Apus या ऍप्सचा समावेश आहे.
याबाबत बोलताना टिकटॉककडून असं सांगण्यात आलं की, टिकटॉक भारतीय कायद्यानुसार सर्व डेटा, गोपनीयता आणि सुरक्षिततेच्या आवश्यकतांचं पालन करत असून भारतील टिकटॉक वापरकर्त्यांविषयी कोणतीही माहिती चीनी सरकारसह इतर कोणत्याही परदेशी सरकारला शेअर केली गेली नाही.