UP मधील YouTuber च्या घरावर Income Tax ची धाड; घरात सापडली 24 लाखांची कॅश

Income Tax Raid At YouTuber Home: आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी या युट्यूबरच्या घरावर छापा टाकला असता त्याच्या घरी 24 लाख रुपये रोख रक्कम सापडली. या युट्यूबरच्या भावाने त्याला अडकवण्यासाठी हा कट असल्याचा आरोप केला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 18, 2023, 01:05 PM IST
UP मधील YouTuber च्या घरावर Income Tax ची धाड; घरात सापडली 24 लाखांची कॅश title=
कुटुंबाने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत (प्रातिनिधिक फोटो)

उत्तर प्रदेशमधील बरेली येथे आयकर विभागाने एका युट्यूबरच्या घरावर सोमवारी छापेमारी केली. या युट्यूबरकडून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी तब्बल 24 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली. ज्या युट्यूबरविरोधात ही कारवाई करण्यात आली त्याचं नाव तस्लीम खान असं आहे. तस्लीमने चुकीच्या पद्धतीने युट्यूबच्या माध्यमातून पैसा कमवल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये तस्लीमविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

कटात अडकवलं जात असल्याचा आरोप

समोर आलेल्या माहितीनुसार, तस्लीम मागील 2 वर्षांपासून युट्यूबवर एक चॅनेल चालवतो. तस्लीमचा भाऊ फिरोज याने भावाविरोधात झालेल्या कारवाईचा निषेध केला आहे. एका नियोजित कटानुसार माझ्या भावाला अडकवण्यात येत आहे, असं सांगतानाच फिरोजने तस्लीमवरील सर्व आरोप खोटे असल्याचं म्हटलं आहे.

1 कोटी 20 लाख रुपयांची कमाई

तस्लीम हा बरेलीमधील नवाबगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीत वास्तव्यास आहे. तस्लीमच्या युट्यूब चॅनेलचं नाव 'ट्रेडिंग हब 3.0' असं आहे. या चॅनेलवरुन शेअर करण्यात येणारे व्हिडीओ हे शेअर बाजारामधील व्यावहारासंदर्भातील टीप्सबद्दल आहेत. तस्लीमचा भाऊ फिरोजने दिलेल्या माहितीनुसार या चॅनेलच्या माध्यमातून आतापर्यंत 1 कोटी 20 लाख रुपयांची कमाई केली आहे. फिरोज हा सुद्धा तस्लीम चालवत असलेल्या चॅनेलचा मॅनेजर आहे.

4 लाख कर भरल्याचा दावा

फिरोजने आपण युट्यूबच्या माध्यमातून झालेल्या कमाईसाठी 4 लाखांचा कर भरल्याचा दावाही केला आहे. "आम्ही काहीही चुकीचं केलेलं नाही. आम्ही युट्यूब चॅनेल चालवतो ज्यामधून आमची चांगली कमाई होते हे सत्य असलं तरी याच गैर मार्गाने व्यवहार झालेले नाहीत," असं फिरोज म्हणाला आहे. तस्लीमच्या आईनेही आपल्या मुलाला चुकीच्या पद्धतीने अटक करण्यात आल्याचा दावा केला आहे. 

युट्यूबवरुन कमाईचे नियम काय?

युट्यूब कंपनी आपल्या कंटेट क्रिएटर्सला जाहिरातींच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशांपैकी काही हिस्सा देते. यासंदर्भातील काही निकष कंपनीने तयार केले आहेत. या निकषांमध्ये पात्र ठरणाऱ्या युट्यूब चॅनेललाच कंपनीकडून कमाईमधील टक्केवारी मिळते. सध्याच्या नियमानुसार किमान 500 सबस्क्रायबर्स असलेल्या चॅनेलला मॉनेटाइज कंटेटसाठी अर्ज करता येतो. मात्र त्याचबरोबर या चॅनेलवरील एकूण वॉचटाइम हा 3 हजार तासांचा असणं आवश्यक आहे. म्हणजेच या चॅनेलवर अपलोड केलेले व्हिडीओ एकूण 3 हजारांहून अधिक तास पाहिले गेलेले असावेत. याशिवाय 90 दिवसांमध्ये किमान 3 व्हिडीओ अपलोड करणंही अपेक्षित आहे. जून 2023 मध्येच कंपनीने हे नियम बदलले असून नियम अधिक शिथिल करण्यात आले आहेत.