WhatsApp लपून ऐकतंय सर्व बोलणं? मायक्रोफोनचा होतोय वापर? Twitter इंजिनिअरने पोस्ट केली संपूर्ण टाइमलाइन

WhatsApp Listening Users: जगभरात मेसेज पाठवण्यासाठी व्हॉट्सअप (WhatsApp) हे सर्वाधिक वापरलं जाणारं अ‍ॅप आहे. या प्लॅटफॉर्मवर व्हॉइस मेसेज आणि कॉलिंगची सुविधाही मिळकतो. यासाठी आपल्याला अॅपमधील मायक्रोफोनला परवानगी द्यावी लागते. दरम्यान काही युजर्स व्हॉट्सअप या परवानगीचा गैरवापर करत असून लपून आमचं बोलणं ऐकत असल्याचा आरोप केला आहे.   

शिवराज यादव | Updated: May 10, 2023, 03:43 PM IST
WhatsApp लपून ऐकतंय सर्व बोलणं? मायक्रोफोनचा होतोय वापर? Twitter इंजिनिअरने पोस्ट केली संपूर्ण टाइमलाइन title=

WhatsApp Listening Users: जगभरात इंस्टंट मेसेजिंगसाठी व्हॉट्सअप (WhatsApp) सर्वाधिक वापरलं जाणारं अ‍ॅप आहे. मोबाइल वापरकर्त्यांमध्ये व्हॉट्सअप हे अ‍ॅप नसणारी एखादी व्यक्ती सापडणं तसं थोडं दुर्मिळच आहे. पण हे व्हॉट्सअप वापरणं सुरक्षित आहे का? अशी चर्चा सध्या सुरु आहे. याचं कारण म्हणजे व्हॉट्सअप लपून आपलं बोलणं ऐकत असल्याचा आरोप काही युजर्सनी केला आहे. यानंतर ट्विटरला (Twitter) यावर चर्चा सुरु असून अनेकजण आपापले अनुभव शेअर करत आहेत. 

याआधी तुम्ही अनेकदा गुगल (Google) आणि फेसबुक (Facebook) बॅकग्राऊंडला आपलं बोलणं ऐकत असल्याचं ऐकलं असेल. म्हणजेच जेव्हा फोनवर तुम्ही हे अ‍ॅप वापरत नसता तेव्हाही तुमचं संभाषण त्यांच्याकडून ऐकलं जात असतं. याचमुळे आपण ज्या गोष्टी किंवा वस्तूंबद्दल चर्चा करत असतो त्या आपल्याला जाहिरातीच्या माध्यमातून दिसत असतात. सध्या व्हॉट्सअपही असंच करत असल्याचा दावा काही युजर्स करत आहेत. 

Foad Dabiri या युजरने ट्विटरला एक ट्वीट केल्यानंतर ही चर्चा सुरु झाली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये सांगितलं आहे की, आपण जेव्हा झोपलो होतो तेव्हाही व्हॉट्सअप त्यांच्या मोबाइलचा मायक्रोफोन वापरत होता. 

त्यांनी ट्विटरला एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यामध्ये ते त्यांच्या मोबाइलवर व्हॉट्सपअपने नेमकं कधी कधी मायक्रोफोनचा वापर केला याची माहिती दिली आहे. Foad Dabiri ट्विटर इंजिनिअर आहेत. यामुळे ट्विटरचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी हे ट्विट रिट्विट केलं आहे. आता व्हॉट्सअपवर विश्वास ठेवू शकत नाही असं ते म्हणाले आहेत. 

Foad Dabiri यांनी सांगितलं आहे की, त्यांच्याकडे Pixel 7 Pro स्मार्टफोन आहे. रात्री जेव्हा ते झोपले होते तेव्हा व्हॉट्सअप त्यांच्या मोबाइलचा मायक्रोफोन वापरत होता. दरम्यान यावर व्हॉट्सअपने उत्तर दिलं असून आपण आपण ही आरोप करणाऱ्या ट्विटर इंजिनिअरच्या संपर्कात असल्याची माहिती दिली आहे. अँड्रॉइर मोबाइलमधील बगमुळे ही समस्या येत असावी असा अंदाज व्हॉट्सपअने व्यक्त केला आहे. 

व्हॉट्सअप नेहमीच आपल्या प्लॅटफॉर्मवर चॅट आणि कॉल एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असल्याचं सांगते. एंड-टू-एंड एन्क्रिप्टेडचा अर्थ मेसेज पाठवणारा आणि मिळवणारा यांच्यातील संभाषण तिसरी व्यक्ती पाहू किंवा वाचू शकत नाही. म्हणजेच एखाद्याला पाठवलेला मेसेज फक्त रिसिव्हरच्या फोनमध्ये पाहिला जाऊ शकतो. तिसरी व्यक्ती हा मेसेज पाहू शकत नाही. कंपनीने आपल्या वेबसाईटवरही याची माहिती दिली आहे. 

पण तुमच्या मनात शंका असेल तर तुम्ही मायक्रोफोन आणि कॅमेरा वापरण्यासाठी दिलेली परवानगी काढून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला सेटिंगमध्ये जाऊन मायक्रोफोन परमिशन सर्च करावं लागेल. याठिकाणी तुम्ही मायक्रोफोनसाठी दिलेली परवानगी आणि त्याचा वापर याची माहिती मिळू शकता. येथूनच तुम्ही परवानगी काढून घेऊ शकता.