धक्कादायक, मुंबईपाठोपाठ ठाण्यातही बोगस लसीकरण

कंपनीचे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आयोजित केलं होतं शिबिर

Updated: Jun 25, 2021, 09:48 PM IST
धक्कादायक, मुंबईपाठोपाठ ठाण्यातही बोगस लसीकरण title=

कपिल राऊत, झी 24 तास, ठाणे : मुंबईपाठोपाठ ठाण्यातही बोगस लसीकरण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या टोळीने 116 जणांना बोगस लस टोचून 1 लाख 16 हजार रुपयांची फसवणूक केली असल्याचं समोर आले आहे. त्यातील चार जणांना बनावट प्रमाणपत्रही देण्यात आली आहेत.

मुंबईत बोगस लसीकरणाचं प्रकरण समोर आल्यानंतर यामध्ये अटकेत असलेल्या आरोपींनी ठाण्यातही हा कारनामा केल्याचं चौकशीत समोर आलं होतं. याप्रकरणी नौपाडा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता आरोपी महेंद्र सिंग आणि त्याचे सहकारी श्रीकांत माने, संजय गुप्ता, सिमा अहुजा व करीम यांच्या टोळीने 26 मेला नितीन कंपनी जवळच्या श्री जी आर्केडमधील रेन्यूबाय या कंपनीसाठी लसीकरण केल्याची माहिती समोर आली. कंपनीचे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आयोजित या शिबिरात आरोपींनी बोगस डोस दिले. त्यासाठी प्रत्येक लसीमागे एक हजार रुपये या प्रमाणे ११६ जणांच्या लसीकरणासाठी एक लाख १६ हजार रुपये वसुल केले.

विशेष म्हणजे त्यातील चार जणांना बनावट प्रमाणपत्रही देण्यात आलं. मुंबई पोलिसांनी बनावट लसीकरणाचा पर्दाफाश केल्यानंतर फसवणूक झालेल्या रेन्युबाय डॉट कॉम या कंपनीचे क्लस्टर सेल्स मॅनेजर उर्णव दत्ता यांनी नौपाडा पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी या आरोपींविरोधात गुन्हे दाखल केले असून सध्या हे सर्व आरोपी मुंबईत अटकेत असल्याची माहिती नौपाडा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरिक्षक अनिल मांगले यांनी दिली.