नागपूरच्या माजी लष्करी अधिकाऱ्याचा गाझातील हल्ल्यात मृत्यू; पुण्याशी होतं खास नातं

Ex Indian Army Colonel Killed in Gaza: कारमधून एका रुग्णालयामधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जात असतानाच त्यांच्या कारवर हल्ला करण्यात आला. ते दहशतवाविरोधी कारवायांचे तज्ज्ञ होते.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 15, 2024, 09:26 AM IST
नागपूरच्या माजी लष्करी अधिकाऱ्याचा गाझातील हल्ल्यात मृत्यू; पुण्याशी होतं खास नातं title=
गाझामध्ये झालेल्या हल्ल्यात मृत्यू (कारचा फोटो प्रातिनिधिक, सौजन्य - रॉयटर्स)

Ex Indian Army Colonel Killed in Gaza: भारतीय लष्करामधून निवृत्त झालेले कर्नल वैभव अनिल काळे यांचं गाझामधील एका हल्ल्यात निधन झालं आहे. वैभव काळे हे मूळचे नागपुरमधील लक्ष्मीनगर येथील रहिवाशी होते. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा आणि संरक्षण विभागात 'संरक्षण समन्वय अधिकारी' म्हणून वैभव काळे कार्यरत होते. मागील वर्षी गाझामध्ये युद्धाला सुरुवात झाल्यापासून आंतरराष्ट्रीय संस्थेच्या एखाद्या उच्च पदस्थ अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना असल्याचं अनेक वृत्तसंस्थांनी म्हटलं आहे. वैभव काळे हे जुलै 2022 मध्ये भारतीय लष्कारमधून निवृत्त होऊन संयुक्त राष्ट्रांसाठी काम करत होते. ते 46 वर्षांचे होते.

22 वर्ष लष्करी सेवा

पुण्यातील खडकवासला येथील राष्ट्रीय सुरक्षा अकादमीमधून (एनडीए) वैभव काळे यांनी लष्करी प्रशिक्षण पूर्ण केलं होतं. ते जम्मू आणि काश्मीर रायफल्सच्या 11 व्या बटालियनमध्ये ते जून 2020 पासून निवृत्तीपर्यंत कार्यरत होते. ते दहशतवाविरोधी कारवायांचे तज्ज्ञ होते. आपल्या 22 वर्षांच्या लष्करी सेवेमध्ये त्यांनी अनेक पदं भूषवली. संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अंतोनिओ गुटेरेस यांनी या हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. इस्रायलने या प्रकरणाच्या स्वतंत्र चौकशीचे आदेश दिले आहेत. 

लोकांच्या आयुष्यात बदल घडवण्याची इच्छा

भारतीय लष्करामधून 2022 मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर वैभव काळे हे त्यांच्या कुटुंबासहित पुण्यात स्थायिक झाले होते. पुण्यामध्ये त्यांनी दोन खासगी कंपन्यांमध्ये नोकरीही केली होती. या कंपन्यांमध्ये ते सुरक्षेसंदर्भातील उच्च पदस्थ अधिकारी म्हणून कार्यरत होते. मात्र नंतर मानव सेवा करण्याच्या उद्देशाने वैभव काळेंनी संयुक्त राष्ट्रांत काम करण्यास पंसती दिली होती. लोकांच्या आयुष्यात आपण काहीतरी बदल घडवणारं काम करावं असं त्यांना फार वाटायचं. त्यामुळेच त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा आणि संरक्षण विभागात 'संरक्षण समन्वय अधिकारी' म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला होता.

पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार

वैभव काळे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परविवार आहे. 2004 मध्ये वैभव काळे भारतीय लष्करामध्ये रुजू झाले होते. त्यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये सन 2009 ते 2010 दरम्यान सेवा बजावली होती. त्यांचं उच्च शिक्षण दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठातून झालं. त्यांनी बी.ए. ची पदवी जेएनयूमधून घेतली होती. त्यांचे प्राथमिक शिक्षण नागपुरमधील पारंजपे माध्यमिक शाळा तसेच भवन्स विद्या मंदिर येथे झाले होते. 

गाडीवर झाला हल्ला

सोमवारी सकाळी वैभव काळे आपल्या सहकाऱ्यांसहीत संयुक्त राष्ट्रांच्या वाहनाने राफा येथील युरोपीय रुग्णालयाकडे जात असताना त्यांच्या वाहनावर हल्ला झाला. या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू झाला तर त्यांचे इतर सहकारी गंभीर जखमी झाले आहेत.