Haunted Rolls Royce of Lonavala: भुताटकीचे कथित अनुभव आलेल्या जागा किंवा पछाडलेल्या जागा म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या ब्रिटीश कालीन अनेक जागा कायमच चर्चेत असतात. तुम्ही सुद्धा अशा एखाद्या जागेची किंवा परिसराची एखादी गोष्ट नक्कीच कधी ना कधी ऐकली असेल. या अशा कथांमागील सत्य नेमकं उलगडून सांगता येणं कधीतरी कठीण अशतं. मात्र या अशा गोष्टी केवळ घर, इमारती किंवा जागांपुरत्या मर्यादीत नसतात. उदाहरण घ्यायचं झालं तर राजस्थानमधील बुलेट बाबा समाधी आहे. या ठिकाणी चक्क बुलेट बाईकची पूजा लोक करतात. अशाचप्रकारे लोणावळ्यामध्ये एका पछाडलेल्या रोल्स रॉयसची कथा कुप्रसिद्ध आहे.
तुम्ही पुणे किंवा लोणावळ्याच्या आजाबाजू्च्या परिसरामध्ये राहत असाल किंवा कोणी तुम्हाला पुण्यातील अशा कथित भुताटकीच्या कथा सांगितल्या असतील तर त्यामध्ये आयशा व्हिला आणि याच बंगल्यात पार्क केलेल्या पछाडलेल्या रोल्स रॉयसची कथा तुम्ही ऐकली असेल. मात्र या पछाडलेल्या बंगल्याला काही तरुणांनी दिलेल्या भेटीच व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. हे तरुण बाईक रायडर्स असून या दंतकथा ऐकून त्यांनी आयशा व्हिलाला भेट दिली आणि येथील ही पछाडलेली रोल्स रॉयस पाहिली.
व्हिडीओमधील एका तरुणाने ही कार या ठिकाणी अगदी ब्रिटीश कालावधीपासून असल्याचं सांगितलं. या बंगल्यात राहणाऱ्या कुटुंबाची हत्या करण्यात आली होती. तसेच या बंगल्यातील 17 वर्षीय आयशा नावाच्या तरुणीवर सामुहिक बलात्कार करुन तिची याच बंगल्यात हत्या करण्यात आल्याचा दावा केला जातो. या घटनेनंतर या बंगल्यामधून विचित्र आवाज येणं, आकृत्या दिसणं असे भास होऊ लागले. हा बंगला पाहण्यासाठी गेलेल्या तरुणांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये या बंगल्यात सध्या कोणी राहत नसलं तरी इथे आत्म्यांचा वावर असल्याचा दावा केला.
आयशा बंगल्याची आणखी एक कथा सांगितली जाते. या बंगल्यामध्ये एक ख्रिश्चन जोडपं पाहायचं. त्यांना आयशा नावाची 17 वर्षीय मुलगी होती. एका रात्री या घरावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला करुन जोडप्याची हत्या केली. या कथेमध्ये आयशाची हत्या करण्यात आली की नाही हे सांगण्यात आलं नाही. ही रोल्स रॉयस या जोडप्याचीच असून तेव्हापासून ती अशीच पडून आहे. मात्र या दोन्ही केवळ दंतकथा असून यात कितीपत सत्य आहे याची पडताळणी करणं कठीण आहे.
ही कार रोल्स रॉयसची सिलव्हर शॅडो मॉडेल आहे. 1965 ते 1980 दरम्यान या कारची निर्मिती झाली. या कारमध्ये 6.75 लिटर व्ही 8 पेट्रोल इंजिन आहे. युट्यूबवरील अन्य एका व्हिडीओमध्ये या कारच्या मालकाला आता ही कार दुरुस्त करायची आहे. ही कार 2004 साली लकीर नावाच्या चित्रपटातही दिसली होती.
आयशा बंगला सध्या जुन्या मुंबई-पुणे मार्गावर खंडाळ्यात आहे. या बंगल्याची विक्री होऊ नये या उद्देशाने भुताटकीच्या गोष्टी उगाच पसरवण्यात आल्याचीही चर्चा आहे. अशा दंतकथांचा उगम शोधणं फारच कठीण असतं. मात्र या ठिकाणी माणसांचा वापर नसल्याने हा बंगला आणि त्यामध्ये उभी असलेलवी रोल्स रॉयस एखाद्या भयान घटनेचे साक्षीदार असल्यासारखं नक्कीच वाटतं. हा व्हिडीओ 6 वर्षांपूर्वीचा असून तेव्हापासून आजपर्यंत या गाडीची अवस्था अधिकच खराब झाली असणार. रस्त्यावरुन जाणारे लोक या कारवर दगड फेकून मारता. ज्यामुळे कारची विंडशिल्ड, हेललॅम्स फुटले आहेत. या कारचा पुढील बराच भाग गंजला आहे.