Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Election 2024: महाराष्ट्रातील 11 मतदारसंघांमध्ये आज मतदान पार पडत असून त्यामध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचाही समावेश आहे. मात्र या मतदारसंघामध्ये मतदानाला जाताना एका मतदाराचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. प्रकाश चीनकटे असं मृत्यू झालेल्या मतदाराचं नाव आहे. मतदान करायला जात असतानाच त्यांना मतदान केंद्राजवळ चक्कर आली आणि तिथेच ते खाली कोसळले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
मतदान केंद्रापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर असताना मतरादाचा मृत्यू ओढावल्याची घटना महाड तालुक्यात घडली आहे. येथील किंजळोली दाभेकर कोंडमध्ये मतानाला निघालेल्या प्रकाश चीनकडे यांनी प्राण गमावले. प्रकाश यांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला स्थानिक प्रशासनाने दुजोरा दिला आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रकाश चीनकडे यांना लगेच महाडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलं. मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना ब्रॉट डेड म्हणजेच रुग्णालयात आणण्याआधीच मृत्यू झाला, असं घोषित केलं. त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. यासंदर्भातील चाचण्या आणि तपासण्या केल्यानंतरच मृत्यूचं खरं कारण समोर येईल असं सांगितलं जात आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये भाजपाचे नारायण राणे आणि ठाकरे गटाचे विनायक राऊत यांच्यामध्ये थेट लढत आहे.
मतदानाला जाणाऱ्या मतदारांना ऊन्हाचा त्रास होऊ नये म्हणून अनेक ठिकाणी सावलीसाठी मतदानकेंद्रांबाहेर मंडप टाकण्यात आले आहेत. पण मतदानकेंद्रावर पोहचण्याआधीच महाडमधील या मतदाराला चक्कर आली त्यातच त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. ऊन्हाच्या झळा दुपारी 12 नंतर अधिक तिव्र आणि दाहक होतात. त्यामुळेच सकाळच्या सत्रात मतदान करण्याचा कल अनेक ठिकाणी मतदारांमध्ये दिसून येतो. मात्र सध्या सकळी आठ वाजल्यापासूनच अनेक भागांमध्ये उन्हाचा त्रास जाणवू लागतो. त्यामुळेच मतदारांनी काळजी घ्यावी असं आवाहन स्थानिक प्रशासनाद्वारे केले जाते.
महाराष्ट्रात सकाळी 9 वाजेपर्यंत 6.64 टक्के मतदान झालं. यापैकी सर्वाधिक मतदान हे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये झालं. इथे 8.17 टक्के मतदान झालं. तर सर्वात कमी म्हणजेच 4.99 टक्के मतदान माढ्यात झालं आहे. मतदानसंघनिहाय टक्केवारी खालीलप्रमाणे -
लातूर - 7.91
सांगली - 5.81
बारामती - 5.77
हातकणंगले - 7.55
कोल्हापूर - 8.04
माढा - 4.99
धाराशिव - 5.79
रायगड - 6.84
रत्नागिरी - 8.17
सातारा - 7
सोलापूर - 5.92