विधानसभा निवडणूक १५ ते २० ऑक्टोबरदरम्यान होणार?

१५ सप्टेंबरपासून राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागेल.

Updated: Jun 25, 2019, 03:51 PM IST
विधानसभा निवडणूक १५ ते २० ऑक्टोबरदरम्यान होणार? title=

पुणे: राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीचा मुहूर्त जवळपास निश्चित झाला आहे. येत्या १५ सप्टेंबरपासून राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागेल. त्यानंतर साधारण १५ ते २० ऑक्टोबरच्या दरम्यान राज्यभरात मतदानप्रक्रिया पार पडेल, असा अंदाज राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वर्तविला आहे. ते मंगळवारी पिंपरी येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. 

लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्र आणि हरियाणा या महत्त्वाच्या राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत शिवसेना-भाजपने लोकसभेतील यशाची पुनरावृत्ती करण्याचा निर्धार केला आहे. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच चंद्रकांत पाटील यांनी  'अब की बार २२० पार, फिर एक बार शिवशाही सरकार' अशी घोषणा दिली होती. 

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यव्यापी यात्रा काढणार असल्याचे जाहीर केले आहे. ऑगस्ट महिन्यात ही यात्रा काढली जाईल. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे भाजपामध्ये चैतन्याचं वातावरण असून याच अनुकूल वातावरणाचा लाभ उठवण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे.

मात्र, शिवसेना आणि भाजप यांच्यात मुख्यमंत्रिपदावरून कुरबुरी सुरु असल्यामुळे दोन्ही पक्षांच्या नेतृत्त्वाची डोकेदुखी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी विधानभवनातील संयुक्त सभागृहात आज भाजपा-शिवसेनेची संयुक्त बैठक पार पडली. यावेळी शिवसेना आणि भाजपाच्या कुठल्याच मंत्री आणि आमदारांनी माध्यमांशी बोलू नये, अशी स्पष्ट तंबी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मंत्री आणि आमदारांना दिली.