भुवनेश्वर : आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी ओडिशा सरकारने पुढाकार घेतलाय. विवाहाच्या प्रोत्साहन अनुदानात दुपट्टीने वाढ केलेय. ही रक्कम आता १ लाख रुपये करण्यात आली आहे.
आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती अनुसूचित जाती, जनजाती विकास, अल्पसंख्यांक आणि दलित वर्ग कल्याण विकास सचिव एस कुमार यांनी दिली. आंतर जातीय विवाह करणाऱ्या जोडप्याला ५० हजार रुपये देण्यात येत होते. ते आता १ लाख रुपये करण्यात आलेत.
ही प्रोत्साहन रक्कम आर्थिक निकष बघून वाढवून देण्यात आली आहे. या पैशाचा उपयोग नव दाम्पत्य घर खरेदीसाठी किंवा जमीन तसेच भांडी खरेदी करण्यासाठी करु शकतात. राज्य सरकारने २००७मध्ये प्रोत्साहन रक्कम १० हजारांवरून ५० हजार केली होती. आता त्यात आणखी वाढ करण्यात आल्याची माहिती एस कुमार यांनी दिली.