चीन : कधी कोरोना, तर कधी सीमेवरच्या कुरघोड्या. या ना त्या कारणानं नेहमीच चर्चेत असलेला चीन आता एका वेगळ्याच कारणानं जगाच्या नजरेत आला आहे. चीननं आपल्या कृत्रिम सूर्याच्या मदतीनं एक नवा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. चीननं हेफेई इथल्या न्यूक्लिअर फ्यूजन रिऍक्टरमधून 1056 सेकंदात म्हणजेच अवघ्या 17 मिनिटांत 7 कोटी अंश सेल्सिअस ऊर्जा निर्माण केली. गेल्या वर्षी 30 डिसेंबरला हा विक्रम करण्यात आला होता. मात्र त्याची माहिती आता जाहीर करण्यात आलीय.
चीनमधल्या हेफेई इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल सायन्सेसनं टोकामक हिटिंग सिस्टीम प्रोजेक्ट सुरू केला आहे. चायना अकादमी ऑफ सायन्सेसचे संशोधक गोंग शियाजूयांच्या नेतृत्वात हा प्रयोग सुरू आहे. याठिकाणी हेवी हायड्रोजनच्या मदतीनं हेलियम निर्माण केला जातो. या काळात अतिशय मोठ्या प्रमाणात ऊर्जानिर्मिती होते. यापूर्वी या कृत्रिम सूर्यानं 1.2 कोटी अंश सेल्सिअसची ऊर्जा निर्माण केली होती. त्यानंतर आता 7 कोटी अंश सेल्सिअस ऊर्जा निर्मिती करण्यात यश आलं आहे.
चीनच्या या नकली सूर्यातून बाहेर पडलेल्या मोठ्या ऊर्जेनं जगाला मात्र टेन्शन आलंय.
चीननं आपल्या कृत्रिम सूर्याच्या प्रकल्पावर पाण्यासारखा पैसा ओतला आहे. यातून अत्यंत कमी इंधनात मोठ्या प्रमाणात उर्जा निर्मिती होऊ शकते असं चीनला वाटतंय. देशाच्या प्रगतीसाठी ही उर्जा उपयुक्त ठरेल असं चीन साऱ्या जगाला सांगतोय. मात्र चीनचे नापाक मनसुबे जगापासून लपून राहिलेले नाहीत. त्यामुळे या चिनी सूर्याची झळ आपल्याला तर बसणार नाही ना? याचीच चिंता प्रत्येक देशाला वाटतेय.