Indonesia Ferry Sinking: इंडोनेशियात पुन्हा एकदा समुद्रात मोठी दुर्घटना घडली आहे. सोमवारी सुलावेसी बेटावर एक बोट बुडाल्याने 15 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसंच 19 जण बेपत्ता आहेत. बचावपथक घटनास्थळी दाखल झालेलं असून, बेपत्ता झालेल्यांचा शोध घेतला जात आहे. बोट उलटली तेव्हा त्यामध्ये एकूण 40 प्रवासी होते. यामधील 6 प्रवाशांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आलं आहे. मागील एप्रिल महिन्यात रियाऊ प्रांतात बोट बुडाल्याने 11 लोकांचा मृत्यू झाला होता.
राष्ट्रीय तपास आणि बचाव पथकानुसार, इंडोनेशियामधील अधिकाऱ्याने माहिती दिली आहे की, सोमवारी सुलावेसी बेटावर एक बोट बुडाल्याने कमीत कमी 15 लोकांचा मृत्यू झाला आहे. 19 लोक अद्यापही बेपत्ता असून वेगवेगळ्या बचाव पथकांकडून त्यांचा शोध सुरु आहे. या बोटीत एकूण 40 लोक होते अशी माहिती आहे. 6 प्रवाशांना वाचवण्यात यश मिळालं आहे. पण बोट बुडण्याचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मध्यरात्री ही दुर्घटना घडली.
बचावपथकाच्या स्थानिक शाखेचे मोहम्मद अराफा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व मृतांची ओळख पटवण्यात आली असून त्यांचे मृतदेह कुटुंबाकडे सोपवण्यात आले आहेत. दरम्यान, दुर्घटनेतून बचावलेल्या 6 प्रवाशांना स्थानिक रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. एजन्सीकडून अनेक फोटो जारी करण्यात आले आहेत, ज्यामध्ये मृत प्रवाशांचे मृतदेह खाली जमिनीवर ठेवल्याचं दिसत आहे. या मृतदेहांना कपड्याने झाकण्यात आलं आहे.
मोहम्मद अराफा यांनी सांगितलं आहे की, मृतांचा शोध घेण्यासाठी दोन पथकं तयार करण्यात आली आहेत. पहिलं पथक पाण्याच्या आत जाऊन शोध घेईल. तर दुसरं पथक पाण्याच्या वर थांबून दुर्घटनेच्या ठिकाणी मृतदेहांचा शोध घेईल.
आग्नेय सुलावेसी प्रांताची राजधानी केंदरीपासून सुमारे 200 किमी (124 मैल) दक्षिणेस मुना बेटावरील एका खाडीवर बोट लोकांना घेऊन जात होती. त्यावेळी ही दुर्घटना घडली.
17,000 पेक्षा जास्त बेटांचा द्वीपसमूह असलेल्या इंडोनेशियामध्ये बोट हे वाहतुकीचे प्रमुख आणि सामान्य साधन आहे. येथे अशा दुर्घटना होणं सामान्य आहेत. बोटींच्या वाहतुकीसाठी बनवण्यात आलेल्या सुरक्षा निकषांमधील त्रुटी आणि कमकुवत लाईफ सपोर्ट सिस्टीम याची मुख्य कारणं आहेत. यंत्रणेकडे दुर्लक्ष करून क्षमतेपेक्षा जास्त माल बोटीवर चढवणं हेही उघडपणे या अपघातांना निमंत्रण देतं.