मासिक पाळीच्या वेदना रोखण्यासाठी तरुणीने केलेली एक चूक जीवावर बेतली; तुम्ही ही चूक करु नका

लायला हिच्यावर 13 डिसेंबरला सर्जरी करण्यात आली. पण तिला ब्रेन डेड घोषित करण्यात आलं.  

शिवराज यादव | Updated: Dec 19, 2023, 06:21 PM IST
मासिक पाळीच्या वेदना रोखण्यासाठी तरुणीने केलेली एक चूक जीवावर बेतली; तुम्ही ही चूक करु नका title=

युकेमधील एका 16 वर्षीय मुलीच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. गर्भनिरोधक गोळ्या खाल्ल्यानंतर तीन आठवड्यांनी रक्ताच्या गुठळ्या आणि पोटात जंतू निर्माण झाल्याने तिला आपला जीव गमवावा लागल्याचं वृत्त 'द टेलिग्राफ'ने दिलं आहे. लायला खान असं या 16 वर्षीय मुलीचं नाव होतं. 

लायला खानला मासिक पाळीदरम्यान प्रचंड वेदना होत होत्या. यादरम्यान तिला तिच्या मैत्रिणींनी लक्षणं कमी करण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्या खाण्याचा सल्ला दिला. कॉलेजात शिकणाऱ्या लायलाने 25 नोव्हेंबरपासून गोळ्यांचं सेवन करण्यास सुरुवात केली. 5 डिसेंबरला तिला डोकेदुखीचा त्रास जाणवू लागला. नंतर आठवड्याच्या शेवटी तिला उलट्या होऊ लागल्या. 

लायलाच्या कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, ती दर अर्ध्या तासाने उलटी करत असल्याने आम्ही तिला डॉक्टरांकडे नेल. यावेळी डॉक्टरांनी तिच्या पोटात जंतू आहेत सांगत गोळ्या दिला. दरम्यान आपण राष्ट्रीय आरोग्य सेवेच्या हेल्पलाईनवर फोन केला असता धोक्याची कोणतीही बाब नसल्याचं सांगण्यात आलं होतं. 

लायलाच्या नातेवाईकाने सांगितलं आहे की, "रविवारी रात्री ती फार आजारी होती. ती दर अर्ध्या तासाने उलटी करत होती. यामुळे आम्ही सोमवारी सकाळी डॉक्टरांची वेळ घेतली. ती इतकी आजारी असतानाही ते फक्त आजारावरी औषध देत होते आणि आपल्याला हे जंतू वाटत असल्याचं सांगत होते. त्यांनी आम्हाला कोणताही धोक्याचा इशारा दिला नाही आणि गरज लागल्यास रुग्णालयात जा असं म्हणाले".

पण यानंतर तिची प्रकृती आणखीन बिघडली आणि वेदनेने ओरडू लागली. कुटुंबीय तिला रुग्णालयात नेणार होते, पण पायात त्राण नसल्याने ती बाथरुममध्ये खाली कोसळली. ती काहीच प्रतिसाद देत नसल्याने कुटुंबीय तिला कारमधून घेऊन गेले. 

कुटुंबाने रुग्णालयात नेऊन सीटी स्कॅन केलं असता मेंदूत रक्ताच्या गुठळ्या झाल्याचं निदर्शनास आलं. 13 डिसेंबरला तिच्यावर सर्जरी करण्यात आली. पण तिला दुसऱ्या दिवशी ब्रेन डेड घोषित करण्यात आलं. 

"आमचा शोक शब्दात व्यक्त केला जाऊ शकत नाही. ख्रिसमस आलेला असतानाच आमच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आम्हाला काहीच कल्पना देण्यात आली नाही आणि ती दुसऱ्या दिवशी ब्रेन डेड झाली. हे समजण्यापलीकडे आहे. तिने आताच कॉलेज सुरु केलं होतं. आम्ही उद्ध्वस्त झालो आहोत," अशी प्रतिक्रिया कुटुंबाने दिली आहे.