Man Kills Neighbor: वयात आलेल्या आपल्या मुलांचं लग्न हा पालकांचा फार जिव्हाळ्याचा विषय असतो. आपल्याच नाही तर आपल्या आजूबाजूच्या वयात आलेल्या मुला-मुलींच्या लग्नासंदर्भात चौकशीत करत राहणारे अनेकजण आपल्याला वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये आवर्जून भेटतात. 'काय मग कधी करताय लग्न?', 'यंदा कर्तव्य आहे की नाही?', 'कधी दाखवताय सूनमुख?' असल्या प्रश्नांचा सामना आपल्यापैकी अनेकांनी केला असेल. सामान्यपणे जगभरामध्ये थोड्याफार फरकाने हा असाच ट्रेण्ड पाहायला मिळतो. अनेकदा प्राथमिक संवाद साधताना नाव, नोकरी, मूळचे कुठले याबरोबरच लग्न झालं आहे की नाही हे सुद्धा विचारलं जात. सामान्यपणे लग्न झालं नसेल तर कधी करणार हा प्रश्न तर सहाजिकच असतो.
मात्र सातत्याने एखाद्याला लग्नासंदर्भात विचारणं आवडेलच असं नाही. मात्र लग्न कधी करणार? या प्रश्नाला कंटाळून एखाद्याने संतापून थेट प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीची हत्याच केली असं सांगितलं तर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. मात्र खरोखरच असा प्रकार घडला आहे. हा प्रकार इंडोनेशियामध्ये घडला असून सोशल मीडियावर त्याची चांगलीच चर्चा आहे.
इंडोनेशियाच्या दक्षिणेकडे असलेल्या साउथ तपानुली प्रांतामध्ये ही विचित्र घटना घडल्याचं वृत्त 'स्ट्रेट्स टाइम्स'ने दिलं आहे. 29 जुलैच्या रात्री हा संपूर्ण घटनाक्रम घडला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर स्थानिकांनाही धक्का बसला आहे. 45 वर्षीय पारलिंदुंगन सिरगार नावाच्या व्यक्तीने त्याच्या शेजाऱ्याची हत्या केली. हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव असगिम इरियंटो असं असून ते 60 वर्षांचे होते. तू लग्न कधी करणार? असं असगिम इरियंटो पारलिंदुंगन सिरगारला वारंवार विचारत राहायचे. याचाच राग मनात धरुन पारलिंदुंगन सिरगारने असगिम इरियंटोला संपवलं.
29 जुलै रोजी रात्री जवळपास 8 वाजण्याच्या सुमारास पारलिंदुंगन सिरगारने असगिम इरियंटोच्या घरी पोहोचला. पारलिंदुंगन सिरगार लाकडाचं दांडकं घेऊनच शेजाऱ्याच्या घरी दाखल झाला. काहीच न बोलता पारलिंदुंगन सिरगारने शेजाऱ्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. असगिम इरियंटो अचानक झालेल्या या हल्ल्याने घाबरुन गेले. ते धावत घराबाहेर पडले. मात्र पारलिंदुंगन सिरगारने त्यांचा रस्त्यावरही पाठलाग करत त्यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने हल्ला केला. याच हल्ल्यामध्ये असगिम इरियंटोचा मृत्यू झाला.
पोलिसांनी पारलिंदुंगन सिरगारला अटक केली. त्यावेळेस त्याने 60 वर्षीय शेजारी अनेकदा आपल्याला लग्नासंदर्भात प्रश्न विचारायचा. त्याच्या या सततच्या प्रश्नांननी मी वैतागलो होतो. मी त्याच्या या प्रश्नांपासून मुक्ती मिळवण्यासाठी त्याला ठार करण्याचं ठरवलं. पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये असगिम इरियंटो मस्करीमध्ये पारलिंदुंगन सिरगारला सतत 'तू लग्न कधी करणार?' असं विचारायचे.
इंडोनेशियामध्ये सध्या या प्रकरणाची तुफान चर्चा आहे. सतत डिवचल्यावर काय होतं याचं हे उत्तम उदाहरण असल्याचं काहींनी म्हटलं आहे. तर काहीही झालं तरी हा असला प्रकार मान्य करणं शक्य नसल्याचं इतरांनी म्हटलं आहे.