कोरोना विषाणूच नाही तर हे प्राणघातक रोगही प्राण्यांमार्फत पसरले

मानवी संसर्गजन्य रोगांपैकी 60 टक्के आजार प्राण्यांमुळे होतात. 

Updated: Apr 21, 2020, 07:46 PM IST
कोरोना विषाणूच नाही तर हे प्राणघातक रोगही प्राण्यांमार्फत पसरले title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने आतापर्यंत लाखोंवर अनेकांचे प्राण घेतले असून संपूर्ण जगभरात याने कहर केला आहे. कोरोना व्हायरस गेल्या वर्षाच्या अखेरीस वुहान शहरातून पसरला असल्याचं बोललं जातं. काही वैज्ञानिकांचं असं म्हणणं आहे की, हा व्हायरस वटवाघूळपासून उत्पन्न झाला असून पँगोलिनसारख्या सस्तन प्राण्यामार्फत पसरला असल्याची शक्यता आहे.

प्राण्यांपासून पसरलेल्या व्हायरसमध्ये, म्हणजे 'Zoonoses' मध्ये आणखी एका नावाची भर पडली असल्याचं म्हटलं जातंय. 'Zoonoses' म्हणजे असे आजार जे प्राण्यांपासून मनुष्याला झाले आहेत. टीबी, रेबीज, टॉक्सोप्लाज्मोसिस, डेंगू, मलेरिया ही काही आजारांची नावं आहेत जे Zoonoses आहेत. 

कोरोना व्हायरसची सध्याची स्थिती पाहता, IPBESचा असा अंदाज आहे की, Zoonosesमुळे दरवर्षी जवळपास 7 लाख लोकांचा मृत्यू होतो. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमानुसार (UNEP), मानवी संसर्गजन्य रोगांपैकी 60 टक्के आजार प्राण्यांमुळे होतात. तर इबोला, एचआयव्ही, एवियन फ्लू, जीका, सार्स यांसारख्या इतर प्रकारच्या कोरोना व्हायरससारख्या पसरणाऱ्या रोगांच्या तुलनेत हा आकडा 75 टक्के इतका आहे. 

2016च्या यूएनईपीच्या अहवालात असं म्हटलं आहे की, जुनोटिक रोग अनेकदा पर्यावरणीय बदलांमुळे किंवा पर्यावरणीय विघटनामुळे उद्भवतात. पर्यावरणातील किंवा वातावरणातील बदल अनेकदा मानवामुळे निर्माण होतात. पाळीव प्राणी बर्‍याचदा जंगलातून आलेले रोगकारक आणि मानव यांच्यात एका ब्रिजप्रमाणे काम करतात.

दरम्यान, कोरोना व्हायरस मानवी शरीरापर्यंत कशाप्रकारे पोहचला याबाबत संशोधकांनी अद्याप निश्चितपणे काहीही सांगितलं नाही. 

अमेरिकी संशोधकांद्वारा गेल्या आठवड्यात प्रकाशित करण्यात आलेल्या एका अध्ययनातून असं समोर आलं की, मानवामध्ये संक्रमित होणार्‍या तीन-चतुर्थांश विषाणूंमध्ये उंदीर, प्राइमेट्स अर्थात वानर आणि वटवाघूळ यांचा समावेश असतो. परंतु पाळीव प्राणीही जवळपास 50 टक्के आजार पसरवतात असं सांगण्यात आलं आहे.