घरात आईचा मृतदेह पडलेला होता, 2 वर्षाच्या मुलाचा शोध घेतला तर मगरीने जबड्यात पकडून...; पोलीसही हादरले

Crime News: अमेरिकेत (US) बेपत्ता झालेल्या एका मुलाचा मृतदेह मगरीच्या (alligator) जबड्यात सापडल्याने खळबळ माजली आहे. घरात आईचा मतृदेह सापडल्यानंतर पोलीस बेपत्ता असलेल्या दोन वर्षाच्या मुलाचा शोध घेत होते. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.   

Updated: Apr 2, 2023, 12:50 PM IST
घरात आईचा मृतदेह पडलेला होता, 2 वर्षाच्या मुलाचा शोध घेतला तर मगरीने जबड्यात पकडून...; पोलीसही हादरले title=

Crime News: अमेरिकेमधील फ्लोरिडा एका धक्कादायक घटनेनं हादरलं आहे. बेपत्ता झालेल्या 2 वर्षाच्या मुलाचा मृतदेह मगरीच्या जबड्यात सापडल्याने एकच खळबळ माजली आहे. मुलाच्या आईचा मृतदेह घरात सापडल्यानंतर पोलीस बेपत्ता झालेल्या मुलाचा शोध घेत होते. यादरम्यान मगरीच्या जबड्याच मुलाचा मृतदेह आढळल्याची माहिती सेंट पीटर्सबर्ग पोलिसांनी दिली आहे. 

पोलिसांनी याप्रकरणी मुलाच्या वडिलांवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान मगरीला गोळी घालून ठार करण्यात आल्याचं पोलीस प्रमुख अँथनी यांनी सांगितलं आहे. "मुलगा अशा अवस्थेत सापडावा अशी आमची इच्छा नव्हती. पण आम्ही कुटुंबाकडे काहीतरी सोपवू शकलो आहोत," असं पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. 

Taylen Mosley असं या मुलाचं नाव असून तो मंगळवारपासून बेपत्ता होता. त्याची 20 वर्षीय आई Pashun Jeffery चा घरात मृतदेह आढळल्यापासून टायलन सापडत नव्हता असं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांनी मुलाचा वडील 21 वर्षीय थॉमस (Thomas Mosley) याच्यावर दोघांची हत्या केल्याचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलीस प्रमुखांनी दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरापासून 10 मैल अंतरावर असणाऱ्या डेल होल्म्स पार्क (Dell Holmes Park) येथे मुलाचा मृतदेह आढळला. या पार्काजवळच एक तळं आहे. 

जेफरी आणि तिच्या मुलाला नातेवाईकांनी बुधवारी पाहिलं होतं. पण गुरुवारी कोणताही संपर्क होत नसल्याने त्यांनी अपार्टमेंट मॅनेरजला घऱात जाऊन पाहण्यास सांगितलं होतं. यावेळी घरात जेफरीचा मृतदेह आढळला असं पोलिसांनी सांगितलं आहे. मुलाचा मृत्यू कसा झाला याची माहिती शवविच्छेदनानंतरच कळेल असं ते म्हणाले आहेत. 

दुसरीकडे थॉमस हातावर जखमा झाल्याने रुग्णालयात दाखल झाला होता. शुक्रवारीही तो हॉस्टिपलमध्येच होता. त्याने पोलिसांशी बोलण्यास नकार दिला असून, वकिल देण्याची मागणी केली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत असून श्वान, ड्रोन तसंच इतर तपास यंत्रणांची मदत घेत आहेत.