मुंबई : अनेक जण रिटायर्डमेंटनंतर पुण्यात नाहीतर नाशिकमध्ये घर बांधायचं स्वप्न बघतात. पण जर कुणी चंद्रावर घर बांधायचा विचार केला तर त्याचा खर्च किती होईल, काही अंदाज आहे ?
'मनी' ही क्रेडिट ब्रोकर कंपनी आहे. ग्राहकांना त्यांच्या पसंतीची उत्पादनं किंवा व्हेकेशनसाठी कर्ज उपलब्ध करून देते. या कंपनीनं नुकतीच चंद्रावरील वस्तीचा खर्च मांडलाय. घरं बांधण्याची पद्धत, लागणारं साहित्य इत्यादीच्या आधारे ही किंमत काढण्यात आली आहे.
बांधकामासाठी साहित्य अर्थात पृथ्वीवरून पाठवावं लागेल. अवजड उद्योगातील कारखान्यांसारखी भक्कम घरं बांधावी लागतील. चंद्रावर मोठ्या प्रमाणात उल्कापात होत असतो. त्यामुळे तो मारा सहन करण्याची क्षमता असणाऱ्या खिडक्या लागतील. 24 तास शुद्ध हवा आणि पाणी आवश्यक आहे. त्यामुळे पहिलं घर उभारण्याचा खर्च 360 कोटी रुपयांच्या घरात जाईल, असा अंदाज आहे.
साहित्य आणि कामगार उपलब्ध असल्यानं दुसऱ्या घराचा खर्च थोडा कमी होईल. ग्रीनहाऊन उभारून विशेष प्रक्रियेनं भाजीपाला उगवावा लागेल. अणूभट्टीनं वीजनिर्मिती होईल. हा सगळा खर्च महिन्याला 2 पूर्णांक 75 कोटींच्या आसपास असेल.
२०२४ मध्ये नासाचं एक पथक आर्टेमिस मोहिमेअंतर्गत चंद्रावर स्थायी बांधकामासाठी जागा शोधण्याकरता जाणार आहे. चंद्राच्या उत्तर भागात असलेला 'सी ऑफ रेन्स' हा भाग वस्ती करण्यास आदर्श मानला जातोय. याला 'मेयर इम्ब्रियम'ही म्हटलं जातं.
सुमारे 300 कोटी वर्षांपूर्वी एका ग्रहाशी टक्कर झाल्यामुळे हा भाग तयार झाला. त्याचा व्यास गोलाकार असून भोवती सुंदर डोंगररांगा आहेत. एखाद्या हिल स्टेशनसारखा हा भाग आहे. पण तिथं राहायचा खर्च मात्र धडकी भरवणारा आहे.