मुंबई : अमेरिकेमध्ये एका गर्भवती महिलेला कोरोनाची लस देण्यात आली, जेव्हा त्या महिलेची प्रसुती झाली, तेव्हा तिच्या बाळामध्ये आधीच कोरोनाच्या अँटीबॉडीज असल्याचं निष्पन्न झालं. घडलेला प्रकार पाहून बालरोगतज्ज्ञही चक्रावून गेले.
या महिलेला ती गर्भवती झाल्याच्या ३६व्या आठवड्यामध्ये लसीचा डोस देण्यात आलेला. गर्भवती महिलेने मॉडर्नाची लस घेतली होती. लसीचा दुसरा डोस घेणं तिचं बाकी होतं. मात्र एका डोसमध्येच तिच्या बाळातही अँटीबॉडीज तयार झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
जगातली ही पहिलीच केस आहे, ज्यामध्ये जन्मत:च बाळामध्ये कोरोनाच्या अँटीबॉडीज सापडल्या आहेत. नवजात मुलीची प्रकृतीही ठणठणीत आहे. ती जन्मत: तिचे रक्ताचे नमुने तपासण्यात आलेले, तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.
या महिलेच्या पहिल्या डोसचे २८ दिवस उलटल्यानंतर कोरोना लसीचा दुसरा डोसही देण्यात आला आहे. याआधी कोरोनातून बरे झालेल्या महिलांनी जेव्हा आपल्या बाळाला जन्म दिला होता, तेव्हा त्यांच्या बाळांमध्ये कोरोनाविरोधातल्या अँटीबॉडीजचं प्रमाण नगण्य होतं.
जगात समोर आलेली ही पहिलीच केस असल्यानं यावर अजूनही संशोधन होणं गरजेचं आहे. कारण महिला गर्भवती असल्यानंतर नेमकं तिला कोणत्या महिन्यात कोरोनाची लस दिली, तर त्या अँटीबॉडीज बाळामध्येही तयार होतील, याबाबत अजूनही स्पष्टता आलेली नाही.
त्यामुळे गर्भवती महिलेला तसंच स्तनपान करणाऱ्या महिलेला कोरोनाची लस नेमकी कोणत्या कालावधीत द्यायची याबाबत अजूनही तज्ज्ञांचा अभ्यास सुरू आहे.