...अन् कर्मचाऱ्याला लकी ड्रॉमध्ये मिळाली तब्बल 350 दिवसांची भरपगारी रजा, बॉसही अवाक

Viral News: कंपनीने एखाद्या कर्मचाऱ्याला जर काय हवं विचारलं तर पगारवाढ आणि सुट्टी ही दोन उत्तरं तर नक्कीच दिली जातील. पण चीनमध्ये एका कर्मचाऱ्याला कंपनीच्या लकी ड्रॉमध्ये चक्क 350 दिवसांची भरपगारी रजा मिळाली असून त्याची एकच चर्चा रंगली आहे.   

शिवराज यादव | Updated: Apr 15, 2023, 12:19 PM IST
...अन् कर्मचाऱ्याला लकी ड्रॉमध्ये मिळाली तब्बल 350 दिवसांची भरपगारी रजा, बॉसही अवाक title=

Viral News: एखाद्या कंपनीत काम करत असताना जर कंपनीने तुम्हाला काय हवं असं विचारलं तर कर्मचाऱ्यांकडून पगारवाढ आणि सुट्टी ही दोन उत्तरं ठरलेली असतील. पण कंपनीने न मागताच भरपगारी रजा दिली तर काय होईल? आता हे कसं काय शक्य आहे असा विचार तुमच्याही मनात आला असेल ना. पण चीनमध्ये एका कर्मचाऱ्याला एक, दोन नव्हे तर तब्बल 365 दिवसांची पगारी रजा मिळाली आहे. कंपनीच्या लकी ड्रॉमध्ये त्याचं नशीब फळफळलं असून त्याच्या बॉसलाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. 

कंपनीच्या वार्षिक डिनर कार्यक्रमात कर्मचाऱ्याला 365 दिवसांची पगारी रजा मिळाली आहे. यामुळे संपूर्ण चीनमध्ये या कर्मचाऱ्याची चर्चा रंगली आहे. Straits Times च्या वृत्तानुसार, Shenzhen येथे या डिनरचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान कंपनीचं नाव अद्याप समोर आलेलं नाही. 

चीनमधील सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक व्यक्ती खुर्चीवर बसला असून त्याच्या हातात चेक दिसत आहे. या चेकवर 365 दिवसांची पगारी रजा असं लिहिण्यात आलं आहेत. Straits Times च्या वृत्तानुसार, विजेता कर्मचारी हे बक्षीस खरं आहे का? याची वारंवार खातरजमा करत होता असं कंपनीचा कर्मचारी सांगत असल्याचं व्हिडीओत ऐकू येत आहे. दरम्यान कर्मचाऱ्याला हे बक्षीस मिळाल्याचं पाहून त्याच्या बॉसला खरंच वाटत नव्हतं. 

करोनामुळे तीन वर्षांनी कंपनीचा वार्षिक डिनरचा कार्यक्रम पार पडत होता. यावेळी कर्मचाऱ्यांचा कामावरील तणाव कमी करण्याच्या आणि त्यांचं मनोबल वाढवण्याच्या हेतून लकी ड्रॉ खेळण्यात आला. बक्षीस म्हणून एक, दोन दिवसांची सुट्टी दिली जाणार होती. तर शिक्षा म्हणून त्या कर्मचाऱ्याला वेटर म्हणून काम करावं लागणार होतं. 

कंपनीतील कर्मचारी Ms Chen यांनी सांगितलं आहे की, कंपनी विजेत्याशी चर्चा करेल की त्यांना सुट्टीचा आनंद घ्यायचा आहे की, त्या मोबदल्यात पैसे हवे आहेत.

दरम्यान कर्मचाऱ्याला पगारी रजा मिळाल्यानंतर सोशल मीडियावर त्याची चर्चा रंगली आहे. काही नेटकऱ्यांनी कंपनीत नोकरी आहे का? अशी विचारणा केली आहे. दरम्यान काहींनी हे खऱंच शक्य आहे का? अश शंका उपस्थित केली आहे. एका वर्षाने परत आल्यानंतर कदाचित त्याच्या जागी दुसरा कर्मचारी असेल असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.