एखादं लहान मूल घरात एकटं किती दिवस राहू शकतं? याचं उत्तर कदाचित काही दिवस असेल. पण फ्रान्समध्ये 7 वर्षांचा चिमुरडा तब्बल 2 वर्षं घरात एकटाच राहत होता. करोना काळात त्याची 39 वर्षं आई त्याला सोडून निघून केली होती. MailOnline च्या वृत्तानुसार पतीला घटस्फोट दिल्यानंतर मुलाची आई दुसऱ्या महिलेसोबत राहण्यास गेली होती. यावेळी तिने मुलाला घऱातच सोडून दिलं होतं. मुलाला सोडून गेल्याचा आरोपाखाली महिला कोर्टात हजर झाली असता ही घटना उघडकीस आली.
ही घटना समोर आल्यानंतर देशभरात चर्चा सुरु असून खळबळ उडाली आहे. खटल्यादरम्यान मुलगा 2020 पासून फ्लॅटमध्ये कशा पद्धतीने एकटाच राहत होता याचा उलगडा झाला. शेजाऱ्यांनी माहिती दिल्यानंतर हे उघड झालं होतं. खटल्यात जेव्हा फिर्यादी वकिलांनी घटनाक्रम उलगडला तेव्हा अनेकांच्या डोळ्यात पाणी तरळलं. थंडीत गरम पाणी, वीज नसताना मुलगा कित्येक महिने तीन ब्लँकेट घेऊन झोपत होता असं वकिलांनी सांगितलं.
पण या परिस्थितीही मुलाने अत्यंत हुशारीने स्वत:चा सांभाळ केला. मुलगा नियमितपणे शाळेत जाणारी बस पकडत होता. यामुळे त्याच्या शिक्षकांनाही मुलगा कोणत्या स्थितीतून जात होता याची कल्पनाही आली नाही. एका शेजाऱ्याने सांगितलं की, "मुलगा समोरच्या अपार्टमेंटमध्ये राहत होता. पण तो फार सामान्य वागत असल्याने कल्पनाच आली नाही. मी रोज त्याला येताना, जाताना पाहत होतो. पण तो एकटाच राहत असल्याचं वाटलं नाही".
दुसऱ्या एका शेजाऱ्याने सांगितलं की, "मी माझ्या घराच्या बाल्कनीत झाडं लावली आहे. तिथे मी त्याला टोमॅटो खाताना पाहिल्यानंतर लक्षात आलं. तो दुसऱ्या एका लहान मुलाला सोबत घेऊन येत असे. त्याचवेळी मला काहीतरी गडबड असल्याचं लक्षात आलं आणि मी प्रशासनाला कळवलं".
मुलाच्या शाळेतील मित्राने सांगितलं की, तो स्वत:च आपल्या जेवणाची व्यवस्था करत होता. तसंच शाळेत जाण्यासाठी बसही स्वत:च पकडत होता. आई घरात नसताना तो एकटाच राहत होता. एका शेजाऱ्याने मुलाची आई नीट बोलत नसे अशी माहिती दिली आहे. "ती आता दुसऱ्या एका महिलेसोबत राहते. ती घराबाहेर धमकावण्याच्या स्थितीत उभी राहायची. जर असंच वागायचं असेल तर मुलं कशाला जन्माला घालतात".
महिलेच्या फेसबुक पेजवर मुलांचे तसंच तिच्या महिला प्रियकरासोबतचे फोटो आहेत. इतकंच नाही तर ती त्या नात्यातून नव्या मुलाचा विचारही करत आहे.
एका अल्पवयीन मुलाला सोडून दिल्याबद्दल आणि धोक्यात टाकल्यानंतर कोर्टाने सहा महिन्यांची शिक्षा सुनावली होती. मुलाच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
मुलगा आपल्या मित्रांसह खेळणंही टाळत होता. खेळल्यानंत तो थेट घरी जात असे. कदाचित यामुळेच त्याचा जीव वाचला असं मानसोपचारतज्ज्ञांचं म्हणणं आहे. मुलाला आता केंद्रात ठेवण्यात आलं असून, त्याने आईला भेटण्यास नकार दिला आहे.
मुलगा टिनच्या डब्यातून येणारं थंड अन्न, तसंच शेजाऱ्याच्या खिडकीच्या बॉक्समधून येणारे टोमॅटो चोरुन तो पोटाची व्यवस्था करत होता. दरम्यान पोलीस शाळेतील कर्मचाऱ्यांनी चिंता व्यक्त का केली नाही हे शोधण्याचा प्रयत्न करत आहे. मुलगा रोज स्वतःहून शाळेत चालत येताना पाहून अखेर शेजाऱ्याला हे कळवावं लागलं. शेजाऱ्यांनीही आपल्याला लवकर का कळलं नाही याची खंत व्यक्त केली आहे.