IIT Bombayचा विद्यार्थी आता ट्विटरची धुरा सांभाळणार

आता नव्या सीईओ पदाची जबाबदारी पराग अग्रवाल यांच्याकडे असणार आहे.

Updated: Nov 30, 2021, 09:33 AM IST
IIT Bombayचा विद्यार्थी आता ट्विटरची धुरा सांभाळणार title=

मुंबई : जॅक डोर्सी यांनी ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा दिला. यानंतर आता नव्या सीईओ पदाची जबाबदारी पराग अग्रवाल यांच्याकडे असणार आहे. सीईओ पदाचा राजीनामा दिल्यानंतर जॅक डोर्सी यांनी ही घोषणा केली. पराग अग्रवाल सध्या कंपनीत सीटीओ (मुख्य तंत्रज्ञान अधिकारी) म्हणून कार्यरत होते.

विशेष म्हणजे, सोमवारी ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचं वृत्त आलं होतं. यासोबतच पराग अग्रवाल यांना नवे सीईओ बनवण्यात आल्याचं देखील यावेळी सांगण्यात आलं.

मिळालेल्या माहितीनुसार, पराग अग्रवाल यांनी IIT Bombay मधून शिक्षण घेतलं आहे. यानंतर त्यांनी Stanford University मधून डॉक्टरेटची पदवी घेतली आहे. तर शालेय शिक्षण त्यांनी Atomic Energy Central School मध्ये पूर्ण केलं आहे. 

माइक्रोसॉफ्ट, याहूचा अनुभव

पराग 2011 मध्ये ट्विटरमध्ये रुजू झाले. याआधी ते मायक्रोसॉफ्ट, एटी अँड टी आणि याहूमध्ये काम करत होते. तिन्ही कंपन्यांमधील त्यांचं काम रिसर्च ओरिएंटेड होतं. त्यांनी ट्विटरवर जाहिरातीशी संबंधित उत्पादनांवर काम करून सुरुवात केली. यानंतर त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर काम करायला सुरुवात केली.

2018 मध्ये त्यांना कंपनीचं सीटीओ बनवण्यात आलं. असं मानले जातं की, त्याचे अभियांत्रिकी कौशल्य कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जाहिरात नेटवर्कमध्ये आहे. या दोन्ही गोष्टी कंपनीसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. माहितीनुसार, जॅक डोर्सीलाही त्याचं काम खूप आवडतं. या गोष्टीमुळे त्याला कंपनीच्या उच्च पदापर्यंत पोहोचण्यास मदत झाली.

बोर्डाला परागवर विश्वास

ट्विटरच्या स्वतंत्र मंडळाचे अध्यक्ष ब्रेट टेलर म्हणाले, "पराग ट्विटरला चांगल्या पद्धतीने समजतो आणि कंपनीच्या अद्वितीय क्षमतेची कदर करतो. आमची सर्वात महत्त्वाची प्राथमिकता पूर्ण करण्यात त्याचा मोलाचा वाटा आहे. चांगला परिणाम प्रदान देत तो आश्चर्यकारक कामगिरी करेल. मंडळाचा परागवर खूप विश्वास आहे."

2011मध्ये Twitterवर एन्ट्री 

डोर्सी यांनी 2011 मध्ये पराग यांना कामावर घेतलं होतं. कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या मेलमध्ये पराग आणि त्याचं काम त्यांना किती आवडतं हेही त्यांनी लिहिलंय. सीटीओ म्हणून पराग यांनी मशीन लर्निंगवर बरंच काम केलंय. आता अवघ्या 10 वर्षांच्या कालावधीत ते या कंपनीचे सीईओ बनले आहेत.

पराग अग्रवाल यांनी जॅक डोर्सी यांचे आभार मानले आहेत. त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून लिहिलं की, जेव्हा ते या कंपनीत रुजू झाले तेव्हा त्यात 1000 पेक्षा कमी कर्मचारी होते. या दरम्यान अनेक चढउतार आणि आव्हानांना सामोरं जावे लागले. मात्र, त्याचा परिणाम ते सतत पाहत होते.

त्यांनी पुढे लिहिलं आहे की, जग आपल्यावर अजूनही लक्ष ठेवून आहे. याबद्दल वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मतं असतील. कारण त्याला ट्विटर आणि त्याच्या भविष्याची काळजी आहे.