Afghanistan: खतरनाक दहशतवादी तालिबानचा गृहमंत्री, भारताला मानतो नंबर -1 चा शत्रू

भारताला नंबर -1 चा शत्रू मानणाऱ्या सिराजुद्दीन हक्कानीवर अमेरिकेने केलं बक्षीस जाहीर 

Updated: Sep 8, 2021, 10:40 AM IST
Afghanistan: खतरनाक दहशतवादी तालिबानचा गृहमंत्री, भारताला मानतो नंबर -1 चा शत्रू title=

काबूल : अफगाणिस्तानमध्ये अखेर तालिबानच्या सरकारची घोषणा करण्यात आली आहे. अफगाणिस्तानमध्ये आता पंतप्रधानपदापासून ते गृहमंत्रीपदापर्यंतची धुरा भयानक दहशतवाद्यांच्या हाती सोपविण्यात आली आहे. यूएनच्या दहशतवादी यादीत नाव असलेल्या मुल्ला हसन अखुंद यांच्याकडे पंतप्रधान पदाची धुरा सोपविण्यात आली आहे. तर दुसरीकडे मोस्ट वॉन्टेड दहशतवादी असलेल्या सिराजुद्दीन हक्कानीला आता अफगाणिस्तानचे नवे गृहमंत्री बनवले आहे.

भारताला नंबर -1 शत्रू मानणाऱ्या सिराजुद्दीन हक्कानीचा एफबीआयच्या हिटलिस्टमध्ये समावेश आहे. अमेरिकेने या दहशतवाद्यावर 5 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 38 कोटींचे बक्षीस देखील ठेवले आहे. अमेरिका सिराजुद्दीन हक्कानीला आपला सर्वात मोठा शत्रू मानतो. सिराजुद्दीन हक्कानी पाकिस्तानच्या उत्तर वजीरिस्तान येथील आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, हक्कानीने आधी संरक्षण मंत्री पदाची मागणी केली होती. यामुळे मुल्ला उमरचा मुलगा मुल्ला याकूब आणि तालिबानचा सह-संस्थापक मुल्ला अब्दुल गनी बरदार यांच्याशीही त्याचे भांडण झाले. पण नंतर त्याने सहमती दर्शविली आणि अशा प्रकारे हक्कानी नेटवर्कचा नेता अफगाणिस्तानच्या गृह मंत्रिपदासाठी सहमत झाला.

सिराजुद्दीन हक्कानीचं नात पाकिस्तानच्या उत्तर वजीरिस्तान क्षेत्राशी संबंधित आहे. त्याची दहशतवादी संघटना हक्कानी नेटवर्कचे अल-कायदाशी घनिष्ठ संबंध आहेत. एवढंच नाही तर, हक्कानीने पाकिस्तानमध्ये राहून अफगाणिस्तानात अनेक दहशतवादी हल्ले केले होते. यामध्ये अमेरिका आणि नाटो सैन्याला लक्ष्य करण्यात आले.