काबुल : अफगाणिस्तानमध्ये (afghanistan) तालिबाननं (taliban) सत्ता प्रस्थापित केल्यानंतर तिथल्या काळजीवाहू सरकारची घोषणा करण्यात आली आहे. अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारचा गृहमंत्री बनलेला सिराजुद्दीन हक्कानी (sirajuddin haqqani) मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांपैकी एक आहे. अमेरिकेने (America) त्याचावर 50 लाख डॉलर्सचं बक्षीस जाहीर केलं होतं. भारतीय दूतावासावरील हल्ल्यातही त्याचा सहभाग आहे. सिराजुद्दीन हक्कानी पाकिस्तानच्या उत्तर वजीरिस्तान क्षेत्राशी संबंधित आहे. अल कायदा या दहशतवादी संघटनेशीही त्याचे घनिष्ठ संबंध आहेत.
हक्कानीने पाकिस्तानात बसून अफगाणिस्तानात अनेक दहशतवादी हल्ले केले होते. यामध्ये अमेरिका आणि नाटो सैन्याला लक्ष्य करण्यात आलं होतं. याशिवाय सिराजुद्दीन हक्कानी 2008 मध्ये हमीद करझाईच्या हत्येच्या कटात सहभागी होता. सिराजुद्दीनची दहशतवादी संघटना हक्कानी नेटवर्क म्हणूनही ओळखली जाते.
सिराजुद्दीन हक्कानी 2008 मध्ये काबूलमधील एका हॉटेलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वॉन्टेड होता. या हल्ल्यात एका अमेरिकन नागरिकासह सहा जण ठार झाले होते. हक्कानीचे नाव अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये सामील आहे. यापैकी ज्या तीन प्रमुख घटनांमध्ये त्याचा थेट हात आहे त्यापैकी दोन घटना भारतीय दूतावासावरील मोठ्या आत्मघाती हल्ल्याशी संबंधित आहेत. इतकंच नव्हे तर पाकिस्तानशी थेट संबंध असल्यामुळे ही दहशतवादी संघटना आता भारतासाठी मोठ्या चिंतेचं कारण बनली आहे.
सिराजुद्दीन हा जलालुद्दीन हक्कानीचा मुलगा आहे. अफगाणिस्तानातील सरकारविरोधातील हल्ल्यांमध्ये काही वेळा तालिबानपेक्षा हक्कानी नेटवर्कचं नाव पुढे आलं होतं. भारताने अफगाणिस्तानच्या हमीद करझाई सरकारशी जवळीक वाढवायला सुरुवात केली होती, तेव्हाचा हा काळ होता. सरकारविरोधात हक्कानी नेटवर्कची जबाबदारी जलालुद्दीन हक्कानीचा मुलगा सिराजुद्दीनने सांभाळली होती. सिराजुद्दीन वडिलांपेक्षा जास्त धोकादायक मानला जात होता.
2008 पासून 2020 पर्यंत अफगाणिस्तानात झालेल्या अनेक मोठ्या हल्ल्यांमध्ये हक्कानी नेटवर्कचं नाव समोर आलं. सध्या या संघटनेमध्ये 10 हजार ते 15 हजार दहशतवादी असल्याचा अंदाज आहे. अफगाणिस्तानातील अनेक मोठ्या हल्ल्यांमध्ये हक्कानी नेटवर्कचा सहभाग आहे. यामध्ये शेकडो अफगाण नागरिक, अमेरिका आणि इतर देशांचे सैनिक आणि सरकारी अधिकारी मरण पावले.
हक्कानी नेटवर्कच्या तीन सर्वात मोठ्या हल्ल्यांपैकी एक 27 एप्रिल 2008 रोजी झाला. जेव्हा तालिबानसह हक्कानी नेटवर्कच्या दहशतवाद्यांनी तत्कालीन अफगाण अध्यक्ष हमीद करझाई यांच्यावर हल्ला केला. हा हल्ला एका हाय प्रोफाईल लष्करी परेड दरम्यान झाला. ज्यात अमेरिकेचे राजदूतही उपस्थित होते. हा हल्ला बंदूकधारी दहशतवाद्यांनी आत्मघातकी हल्लेखोरांसह केला होता. या हल्ल्यात एका अफगाणिस्तानच्या खासदारासह तीन जण ठार झाले. असं म्हटलं जाते की अफगाणिस्तानच्या राजधानीवर हा पहिला मोठा हल्ला होता.
अफगाणिस्तानातील हक्कानी नेटवर्कच्या आणखी एका मोठ्या हल्ल्याने भारताला धक्का दिला. 7 जुलै 2008 रोजी हक्कानी नेटवर्कच्या दहशतवाद्यांनी काबुलमधील भारतीय दूतावासाला लक्ष्य केलं. दूतावासाची इमारत अफगाणिस्तानच्या सर्वात सुरक्षित भागात होती, पण दहशतवाद्यांनी कारमधून स्फोट घडवून आणला. या हल्ल्यात सहा भारतीयांसह 58 लोक ठार झाले, तर 100 हून अधिक लोक गंभीर जखमी झाले होते.
एवढंच नाही तर 2009 मध्ये या दहशतवादी संघटनेने काबूलमधील भारतीय दूतावासाला पुन्हा लक्ष्य केलं. या आत्मघाती हल्ल्यात 17 जण ठार झाले, तर 63 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. असं म्हटले जाते की भारताने अफगाणिस्तानमध्ये 5280 कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू करण्याचे आश्वासन दिलं होतं. यामुळे पाकिस्तानच्या आयएसआयने या दोन हल्ल्यांमध्ये हक्कानी नेटवर्कला पूर्ण मदत केली होती.