अमेरिकेनं बांधले तालिबानचे हात, 31 ऑगस्टपूर्वी नाही उचलू शकत कोणतंही पाऊल

पण, असं नेमकं का; जाणून घ्या.... 

Updated: Aug 20, 2021, 10:07 PM IST
अमेरिकेनं बांधले तालिबानचे हात, 31 ऑगस्टपूर्वी नाही उचलू शकत कोणतंही पाऊल  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

काबूल : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) सुरु झालेलं तालिबान राज पाहून साऱ्या जगालाच या देशाची आणि तिथं असणाऱ्या नागरिकांची चिंता वाटू लागली आहे. तालिबानी त्यांचे नवे कायदे लागू करत देशात नेमकी काय परिस्थिती आणतील हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे. तिथे माध्यमांशी संवाद साधताना तालिबानकडून बऱ्याच मुद्द्यांवर नागरिकांना आश्वस्त करण्यात आलं आहे. पण, याची शाश्वती मात्र अनेकांच्या पचनी पडताना दिसत नाहीये. 

तिथं अमेरिकेनं (America) अफगाणिस्तानातील सैन्य मागे बोलावल्यानंतर परिस्थिती बदलल्यामुळं या राष्ट्रावर अफगाणी नागरिकांचा असंतोष पाहायला मिळत आहे. तालिबान्यांना अफगाणिस्तानात सत्तेचा कब्जा मिळवला असेल तरीही त्यांचे हात याच अमेरिकेनं बांधलेले आहेत. 

तालिबानशी संपर्कात असणाऱ्या एका व्यक्तीनं दिलेल्या माहितीनुसार तालिबानी त्यांच्या सरकारबाबत 31 ऑगस्टपर्यंत कोणतीही माहिती देणार नाहीत. तोपर्यंत अमेरिकेसोबतच्या सैन्य माघारी घेण्याच्या तहाची मुदत पूर्ण होत नाही. 

गोपनियतेच्या अटीवर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तालिबानमधून तडजोडीच्या वार्ता करणाऱ्यांपैकी अनस हक्कानीनं सांगितल्यानुसार अमेरिकेसोतबता तह पूर्णत्वास जात नाही, तोवर ते (तालिबानी) कोणताही निर्णय लागू करु शकत नाहीत. 

कोणत्याही निर्णयांमध्ये फक्त राजकीय निर्णयांचाच समावेश आहे की आणखी कोणत्या अटींचा यात समावेश आहे याची सविस्तर माहिती मात्र मिळू शकलेली नाही. हक्कानीच्या बोलण्यातून येत्या काळात अफगाणिस्तानमध्ये धार्मिक चळवळी आणि संघटना 31 ऑगस्टनंतर काय करतील आणि पुढच्या तालिबान सरकारमध्ये इतरत्र कोणाला प्रवेश देणार का या मुद्द्यांकडे लक्ष वेधलं गेलं. त्यामुळं आता तालिबानच्या पुढच्या निर्णयाकडे साऱ्याच जगाचं लक्ष लागून राहिलं आहे.