मुंबई : लग्नानंतर अनेक जोडपं हनीमूनसाठी फिरायला जातात. याकाळात नवरा आणि बायको दोघांनाही एकमेकांना ओळखायला आणि काही प्रेमाचे क्षण एकत्र घालवायला मिळतात. बऱ्याचदा जोडपी स्वत: ठरवून आपलं हनिमून प्लान करतात. तर अनेकदा घरातील जवळची मंडळी हनिमून पॅकेज नवरा-नवरीला भेट म्हणून देतात. परंतु एका कपलसोबत हनीमुनला एक विचित्र प्रकार घडला, ज्याबाबत त्यांनी स्वत: Reddit वर शेअर केलं आहे.
खरंतर या कपलला आपल्या घरच्यांकडून हनीमून पॅकेज गिफ्टमध्ये घेणं महागात पडलं, ज्यामुळे अखेर त्यांना आपलं हॉटेल सोडून पळून जाण्याची वेळ आली.
आता तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल की, नक्की असं काय घडलं असावं की, या कपलला हॉटेल सोडून पळावं लागलं असेल? चला जाणून घेऊया या विचित्र कहाणी बद्दल.
खरंतर या नवविवाहित जोडप्याला मुलाच्या आई-वडिलांकडून एका आठवड्याचे हनिमून पॅकेज भेट मिळाले. ज्यामुळे हे जोडपे खूप खुश होते, पण या भेटीसोबत एक अटही त्यांच्यासमोर ठेवण्यात आली होती. ती अशी की या जोडप्यासोबत मुलाचे पालकही त्यांच्या हनीमूनला त्यांच्यासोबत 'ग्रुप ट्रॅव्हल' करतील.
इथ पर्यंत सगळं ठिक होतं परंतु खरा ट्वीस्ट तर पुढे आला. कारण हनिमून दरम्यान, जोडप्याला एकांत मिळू शकला नाही, प्रत्येक वेळी त्यांचे पालक त्यांच्यासोबत राहण्याचा प्रयत्न करत होते. यामुळे दाम्पत्य खूप अस्वस्थ झाले.
हनिमूनच्या वेळी मुलाचे आई-वडील रोज सकाळी ६ वाजता हॉटेलचा दरवाजा ठोठावून दोघांना उठवायचे, त्यानंतर सर्वजण नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण एकत्र करायचे. नाराज झाल्याने या जोडप्याने अनेकदा आई-वडिलांशिवाय वेळ घालवण्याची मागणी केली, परंतु त्याचा काही फायदा झाला नाही.
मुलाने जेव्हा आपल्या पालकांशी याबद्दल खुलेपणाने बोलायचे ठरवले, तेव्हा त्याच्या पालकांनी उत्तर दिले की, त्यांनीच या हनीमूनसाठी स्पॉन्सर केले आहे. त्यानंतर नाराज होऊन या जोडप्याने हॉटेलमधून दुसऱ्या ठिकाणी पळून जाण्याची योजना आखली आणि ती यशस्वी देखील झाली.