Beggar Owns Car: 'ती' Luxury कारमधून यायची आणि मशिदींसमोर भीक मागायची; असं फुटलं बिंग

Beggar Owns Luxury Car: पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये अनेक भिकाऱ्यांना अटक करण्यात आली. त्यापैकी एका महिलेकडे चक्क एक आलिशान कार आढळून आली आहे. पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतलं आहे आणि गाडीही जप्त केली आहे.

Updated: Jan 26, 2023, 09:07 PM IST
Beggar Owns Car: 'ती' Luxury कारमधून यायची आणि मशिदींसमोर भीक मागायची; असं फुटलं बिंग title=
Beggar Owns Luxury Car (photo for representational purpose Reuters)

Beggar Owns Luxury Car: संयुक्त अरब अमिरात (United Arab Emirates) म्हणजेच युएईची राजधानी असलेल्या अबु धाबीमधील (Abu Dhabi) पोलिसांनी शहरातील अनेक भिकाऱ्यांना अटक केली आहे. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेल्या भिकाऱ्यांपैकी एका महिलेकडे चक्क लक्झरी कार असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी (UAE Police) नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या कालावधीमध्ये एकूण 159 भिकाऱ्यांना अटक केली होती. यामध्ये एका महिलेचाही समावेश होता जिच्याकडून पोलिसांनी एक लक्झरी कार जप्त केली आहे. पोलिसांना या महिलेबद्दल जवळपास राहणाऱ्या लोकांनीच माहिती दिली होती. ही महिला आपली आलिशान गाडी पार्क केल्यानंतर भीक मागण्यासाठी शहरातील अनेक मशिदींमध्ये जायची असं तक्रारदार लोकांचं म्हणणं होतं. विशेष म्हणजे तपासात हे आरोप खरे असल्याचं सिद्ध झालं.

पोलिसांनी ठेवली नजर

आबु धाबीमधील रस्त्यांवर फिरणाऱ्या या महिलेसंदर्भातील तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी या महिलेच्या प्रत्येक हलचालीवर नजर ठेवली होती. पोलिसांना या तपासादरम्यान ही महिला शहरातील अनेक मशिदींसमोर भीक मागत असल्याचं लक्षात आलं. ही महिला तिच्या मालकीची लेटेस्ट महागडी गाडी पार्क केल्यानंतर गाडीपासून बरंच अंतर चालत जायची आणि एखाद्या मशिदीसमोर भीक मागायची.

या महिलेविरोधात गुन्हा दाखल

महिलेला अटक करण्यात आल्यानंतर तिच्याकडे पोलिसांना मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडली. या महिलेला केवळ भिकाऱ्यांविरोधात करण्यात आलेल्या कारवाईअंतर्गत कारवाई करण्यात आलेली नाही तर तिच्याविरोधात खोटी माहिती सांगून फसवणूक केल्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

भीक मागणं बेकायदेशीर

युएईमध्ये भीक मागणं बेकायदेशीर असून तो कायद्यानुसार अपराध मानला जातो. पोलिसांनी या माध्यमातून केवळ नोंदणीकृत संस्थांना पैसे दान करा असं सांगितलं आहे. भीक मागताना एखाद्या व्यक्तीला अटक झाली तर त्याला 5 हजार अरब अमीरात द्राम्सचा दंड आणि तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली जाते. तसेच या लोकांना भीक मागण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या हॅण्डलर्सला एक लाख द्राम्सचा दंड आकारला जातो आणि सहा महिन्यांसाठी तुरुंगात खडी फोडायला पाठवलं जातं.

ऑलाइन भीक मागणंही गुन्हा

या देशामध्ये ऑनलाइन माध्यमातून भीक मागणंही कायद्याने गुन्हा आहे. सोशल मीडिया, टेक्स मेसेज, ईमेल यासारख्या प्लॅटफॉर्मवरुन भीक मागणे बेकायदेशीर आहे.