बिटकॉईन घोटाळा; लोकांचे ५४० कोटी रूपये अडकले

या घोटाळ्यामुळे नागरिकांना मोठा धक्का बसला असून, या घोटाळ्याची चर्चा जगभरात सुरू झाली आहे.

Updated: May 26, 2018, 12:17 PM IST
बिटकॉईन घोटाळा; लोकांचे ५४० कोटी रूपये अडकले  title=

जोहान्सबर्ग : क्रिप्टोकरन्सीसंबंधी एक मोठा घोटाळा दक्षिण आफ्रिकेत समोर आला आहे. या घोटाळ्यात व्याजाच्या रकमेत फेरफार करत सुमारे २८,००० हजार लोकांची फसवणूक केल्याचे धक्कादायक वृत्त आहे. यात नागरिकांचे सुमारे १०७ मिलियन सिंगापूर डॉलर्स (भारतीय चलनात सुमारे ५४० कोटी रूपये) अडकले आहेत. या घोटाळ्यामुळे नागरिकांना मोठा धक्का बसला असून, या घोटाळ्याची चर्चा जगभरात सुरू झाली आहे.

लोकांना टक्केवारीचे आमिष

वृत्तसंस्था सिन्हुआने पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात, 'बिटकॉइन ट्रेडींग' कंपनी अर्थात 'बीटीसी ग्लोबल'नावाने अळखल्या जात असलेल्या कंपनीशी संबंधीत हा गैरव्यवहार आहे. या कंपनीने लोकांना पैसे गुंतवण्यास उत्तेजन दिले. तसेच, केलेल्या गुंतवणुकीवर प्रतिदिन दोन टक्के या हिशोबाने प्रत्येक आठवड्याला १४ टक्के तर, प्रति महिना ५० टक्के इतके व्याज देण्याचे आमिष दाखवले. प्रायॉरिटी क्राईन इन्विस्टिगेशन डायरेक्टरेटचे कार्यकारी राष्ट्रीय प्रमुख योलिसा मटकाटा यांनी सांगितले की, हे एक गंभीर प्रकरण आहे. अशी हजारो प्रकरणे असू शकतात. जी अद्याप समोर आली नाहीत. पण, लोकांची फसवणूक झाली आहे.

अपरहण प्रकरणामुळे घोटाळ्याचा भांडाफोड

दरम्यान, हे प्रकरण एका अपहरण प्रकरणानंतर उघडकीस आले. दक्षिण आफ्रिकेतील एका लहान मुलाचे अपहरण झाले होते. अपहरणकर्त्याने मुलाची सुटका करण्याच्या बदल्यात खंडणी मागितली व ही खंडणी बिटकॉइनच्या रूपात दिली जावी अशी मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात हे प्रकरण पुढे आले. दरम्यान, गेल्याच महिन्यात बिटककॉईन आणि त्याच्या सारख्या इतर व्हर्च्युअल करन्सीवरून मोठा गदारोळ पहायला मिळाला होता. बिटकॉईन आणि व्हर्च्युअल करन्सीमध्ये आलेल्या तेजीमुळे अनेक लो जाळ्यात आडकले. ज्यात भारतीयांची संख्याही मोठी होती. अर्थात, बिटकॉईनसारख्या करन्सीपासून नागरिकांनी दूर रहावे असा सल्ला भारत सरकारने केव्हाच दिला आहे.