अमेरिकेनंतर आणखी एका देशाने 'WHO'विरुद्ध दंड थोपटले

कोरोना व्हायरसच्या प्रसारावरुन जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO कडे संशयाने बघितलं जात आहे.

Updated: Jun 6, 2020, 03:59 PM IST
अमेरिकेनंतर आणखी एका देशाने 'WHO'विरुद्ध दंड थोपटले title=

ब्राजिलिया : कोरोना व्हायरसच्या प्रसारावरुन जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO कडे संशयाने बघितलं जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी WHOला देत असलेला निधी बंद करत असल्याची घोषणा केली. यानंतर आता ब्राझीलचे राष्ट्रपती जेयर बोल्सोनारो यांनीही दंड थोपटले आहेत. ब्राझीलला संयुक्त राष्ट्राचं समर्थित WHO पासून वेगळं करण्याची धमकी बोल्सोनारो यांनी दिली आहे.

ब्राझीलमध्ये कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. एवढच नाही तर शुक्रवारी कोरोनामुळे ब्राझीलमध्ये १,४७३ जणांचा मृत्यू झाला. एका दिवसात सर्वाधिक मृत्यू होण्याच्या बाबतीत ब्राझीलने इटलीला मागे टाकलं आहे. रोज होणाऱ्या सर्वाधिक मृत्यूंच्या बाबतीत ब्राझील तिसऱ्या क्रमांकाचा देश बनला आहे. ब्राझीलमधली परिस्थिती भीषण असतानाही राष्ट्रपती अर्थव्यवस्था सुरू करण्यासाठी लॉकडाऊन उठवण्याचं समर्थन करत आहेत. 

ब्राझीलच्या वृत्तपत्रांमध्ये  येत असलेल्या बातम्यांनुसार कोरोना व्हायरसमुळे प्रत्येक मिनिटाला एकाचा मृत्यू होत आहे. अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी लॉकडाऊनचे नियम शिथील करू नका, असं WHOने सांगितलं आहे. ब्राझीलमधली ही परिस्थिती चिंताजनक असल्याची प्रतिक्रियाही WHOने दिली. 

WHO च्या प्रतिक्रियेवर ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी निशाणा साधला. WHO जर पक्षपाती राजकीय संघटना बनणार असेल, तर ब्राझील WHOमधून बाहेर पडेल, असा इशारा जेयर बोल्सोनारो यांनी दिला. बोल्सोनारो यांच्या या इशाऱ्यावर अजून WHOकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. 

ब्राझीलचे राष्ट्रपती जेयर बोल्सोनारो यांच्यावर मास्क न घातल्यामुळे आणि कोरोना व्हायरसला गांभीर्याने न घेतल्यामुळे याआधी बरेच वेळा टीका करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू होत असतानाही बोल्सोनारो यांनी लॉकडाऊन हटवण्याचं समर्थन केलं. कोरोनाच्या संकटात लोकतांत्रिक संस्थांना कमकुवत केल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला.