Brain Eating Amoeba Virus : जगभरात कोरोनाचा (Coronavirus updates) संसर्ग पुन्हा एकदा थैमान घालत असतानाच आता आरोग्य यंत्रणा या परिस्थितीशी दोन हात कसे करायचे यावरच विचार करत आहे. बहुतांश देशांमध्ये सतर्कता म्हणून पुन्हा एकदा सावधगिरीनं काही निर्णय घेण्यात येत आहेत. जगावर असणारं कोरोनाचं संकट शमत नाही, तोच आणखी एका संकटाची चाहूल लागली आहे, त्यामुळं आता अनेकांनाच धडकी भरत आहे. Naegleria fowleri नावाच्या या एका नव्या संसर्गामुळं सर्वांच्याच चिंतेत भर पडू शकते.
दक्षिण कोरियातील (South korea) आरोग्य विभागाशी (health department) संलग्न सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मेंदू खाणाऱ्या अमिबामुळं हा संसर्ग उदयास आल्याचं कळत आहे. आरोग्य विभागानं थायलंडहून (thailand) आलेल्या व्यक्तीचा मृत्यू Naegleria fowleri या संसर्गानं झाल्याचं म्हणत या चर्चांवर शिक्कामोर्तब केलं आहे. या संसर्गामध्ये मानवी मेंदू उध्वस्त होत असल्याचं कळत आहे.
10 डिसेंबरला ही 50 वर्षीय व्यक्ती कोरियामध्ये परतली. जवळपास चार महिने साऊथ ईस्ट एशियन देश, थायलंडमध्ये वास्तव्य करून परतलेल्या या व्यक्तीला कोरियात येताच दुसऱ्या दिवशी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ज्यानंतर काही दिवसांनी त्याचा मृत्यू झाला. स्थानिक वृत्तसंस्थांनी यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं. पहिल्यांदाच या संसर्गाची माहिती अमेरिकेत 1937 मध्ये झाली होती.
Naegleria fowleri हा एक प्रकारचा अमिबा आहे. गोड्या पाण्याची तळी, नद्या, कालवे आणि तलावांत तो आढळतो. नाकावाटे तो शरीरात प्रवेश करतो आणि तिथून मेंदूपर्यंत पोहोचत तेथील पेशींना उध्वस्त करण्यास सुरुवात करतो. सध्याच्या घडीला या संसर्गाची प्रकरणं पूर्णपणे अनपेक्षित आहेत. असं असलं तरीही दक्षिण कोरियामध्ये सतर्कता म्हणून नागरिकांना जलस्त्रोतांमध्ये न पोहण्याचा सल्ला दिला आहे.
इथे कोरोना तिथे Naegleria fowleri....
संपूर्ण जगभरात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनं (Corona bf7 cases) दहशत माजवली आहे. चीनमध्ये परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यामुळं आरोग्य यंत्रणांवरही कमालीचा ताण आला आहे. त्यातच दक्षिण कोरियामध्ये Naegleria fowleri चा रुग्ण आढळल्यामुळं चिंता वाढली आहे. सध्याच्या घडीला या संसर्गाचे आणखी रुग्ण समोर आले नसले तरीही सावधगिरी बाळगणं कधीही उत्तम असं म्हणायला हरकत नाही.