British Prime Minister Rishi Sunak Fined: ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (British PM Rishi Sunak) यांना कारमध्ये सीटबेल्ट न घातल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे. सोशल मीडियासाठी व्हिडीओ शूट करताना ऋषी सुनक यांनी सीटबेल्ट घातलेला नव्हता. त्यानंतर पोलिसांनी थेट पंतप्रधानाच दंड ठोठावला. Lancashire पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
पोलिसांनी पंतप्रधान ऋषी सुनक यांना दंडाची नोटीस पाठवण्यात आल्याचं सांगितलं आहे. सीटबेल्ट न लावल्याबद्दल ऋषी सुनक यांना 100 पाऊंड्सचा दंड ठोठावण्यात आला असल्याचं ते म्हणाले आहेत.
"सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत सीटबेल्ट न घातलेल्या 42 वर्षीय व्यक्तीला आम्ही दंद ठोठावला आहे," असं पोलिसांनी सांगितलं आहे. गुरुवारी ऋषी सुनक यांनी व्हिडीओ शूट करताना सीटबेल्ट न लावल्याबद्दल माफी मागितली होती.
"सीटबेल्ट काढणं ही चूक होती. एक छोटा व्हिडीओ काढण्यासाठी पंतप्रधानांनी त्यांचा सीटबेल्ट काढला होता. आपली चूक झाल्याचं आम्ही पूर्णपणे मान्य करतो आणि त्याबद्दल माफी मागतो," असं सुनक यांच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे. प्रत्येकाने सीटबेल्ट घातलं पाहिजे यावर पंतप्रधान ठाम आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं.
ब्रिटनमध्ये प्रवाशाने कारमध्ये प्रवास करताना सीटबेल्ट घातलेल्या नसल्यास 100 पाऊंड्सचा दंड ठोठावण्याची तरतूद आहे. हे प्रकरण कोर्टापर्यंत गेल्यास दंडाची रक्कम 500 पाऊंड्सपर्यंत जाऊ शकते. अधिकृत वैद्यकीय कारण असेल तरच या नियमातून सूट मिळते.
इंग्लंडमध्ये, 14 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या प्रवाशांनी कार, व्हॅन आणि इतर वाहनांमध्ये सीटबेल्ट लावणं अनिवार्य आहे. 14 वर्षाखालील प्रवाशांसाठी ड्रायव्हर जबाबदार आहेत. सवलतींमध्ये वैद्यकीय कारणास्तव डॉक्टरांचे प्रमाणपत्र असणे किंवा पोलीस, अग्निशमन किंवा इतर बचाव सेवांसाठी वापरल्या जाणार्या वाहनात असणं समाविष्ट आहे.
ऋषी सुनक सरकारच्या नव्या योजनेची प्रसिद्धी करण्यासाठी धावत्या कारमध्ये व्हिडीओ शूट करत होते. यावेळी त्यांनी सीटबेल्ट घातलेला नव्हता. यावेळी पोलिसांच्या बाईक ताफ्यात पुढे धावत असल्याचंही दिसत आहे.
परिवहन विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार 2021 मध्ये यूकेमध्ये रस्ते अपघातात सुमारे 30 टक्के लोकांचा मृत्यू झालेला असून त्यांनी सीटबेल्ट घातलेलं नव्हतं.