चीनच्या गुप्तचर विभागाचे प्रमुख अमेरिकेत फरार झाल्यानं एकच खळबळ

जिनपिंग यांच्यावर ही वेळ का आली?

Updated: Jun 21, 2021, 08:42 PM IST
चीनच्या गुप्तचर विभागाचे प्रमुख अमेरिकेत फरार झाल्यानं एकच खळबळ

नवी दिल्ली : चीनच्या राजकारणात सध्या एक मोठी घटना घडली आहे. चीनच्या गुप्तचर विभागाचे प्रमुख डोंग जिंगवेई अमेरिकेत फरार झाल्यानं एकच खळबळ उडालीये.  त्यानंतर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या सहका-यांना निष्ठा राखण्याची शपथ दिली. जिनपिंग यांच्यावर ही वेळ का आली?

जिंगवेईंच्या पलायनामुळं जिनपिंग अस्वस्थ

डोंग जिंगवेई म्हणजे चीनचे अजित डोवाल... चिनी गुप्तहेर यंत्रणेचे प्रमुख... मात्र एवढ्या महत्वाच्या पदावरचा अधिकारी अमेरिकेला पळून गेल्यानं चीनचं नाक कापलं गेलंय. चिनी कम्युनिस्ट राजवटीसाठी हा मोठा दणका मानला जातो. जिंगवेई फरार झाल्यानं चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या साम्राज्याला जबर हादरा बसलाय.

या पार्श्वभूमीवर जिनपिंग यांनी सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या पोलिट ब्युरोच्या २५ सदस्यांना गेल्या शुक्रवारी पक्षाशी निष्ठा आणि ईमान राखण्याची शपथ दिली. पेइचिंगच्या सीपीसी संग्रहालयात पार पडलेल्या या शपथविधीचं सरकारी टीव्ही चॅनलवरून लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आलं. चीनचे पंतप्रधान ली क्विंग देखील यावेळी उपस्थित होते.

कम्युनिस्ट नेत्यांना निष्ठा राखण्याची शपथ

माओत्सेतुंग नंतर शी जिनपिंग हे कम्युनिस्ट पक्षाचे 'सर्वोच्च' शक्तिशाली नेते बनलेत. डिसेंबर 2012 मध्ये शी जिनपिंग यांनी चीनची सत्ता काबीज केली. कम्युनिस्ट पक्ष, सरकार आणि सैन्यदलावर त्यांची घट्ट पकड आहे. खरं तर 2023 मध्ये त्यांचा राष्ट्राध्यक्षपदाचा दुसरा कार्यकाळ संपणारे. त्यानंतर ते निवृत्त व्हायला हवे होते. मात्र 2018 मध्ये त्यांनी चीनच्या राज्यघटनेत सुधारणा केली.

जास्तीत जास्त दोनवेळा राष्ट्राध्यक्ष होण्याची मर्यादा त्यांनी काढून टाकली. त्यामुळं आता सत्ता ताब्यात ठेवण्याचा जिनपिंग यांचा मार्ग मोकळा झालाय.

आपल्या निर्विवाद सत्तेला कुणी आव्हान देऊ नये, याची काळजी आता शी जिनपिंग घेतायत. डोंग जिंगवेई यांच्यासारखी कथित गद्दारी करू नये, यासाठीच त्यांचा हा सगळा आटापिटा आहे.