लंडन: कोरोना व्हायरसची लागण झालेले ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या महिन्यात बोरिस जॉन्सन यांनी ट्विटरवरून आपली कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे जाहीर केले होते. तेव्हापासून बोरिस जॉन्सन होम क्वारंटाईन होते. मात्र, आता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनेक दिवस उलटूनही बोरिस जॉन्सन यांच्यात कोरोनाची लक्षणे अजूनही दिसत आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
'तबलिगी जमातचा कार्यक्रम झाला नसता तर देशातील परिस्थिती वेगळी असती'
तत्पूर्वी क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांनी टेलिव्हिजनच्या माध्यमातून ब्रिटिश जनतेला संबोधित केले. लोक घरातच राहिले तर आपण लवकरच कोरोनाचा प्रादुर्भा आटोक्यात आणू, असे क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांच्याकडून सांगण्यात आले.
यापूर्वी ब्रिटनच्या राजमुकूटाचे वारसदार प्रिन्स चार्ल्स यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. प्रिन्स चार्ल्स आणि त्यांची पत्नी स्कॉटलंड येथील घरात क्वारंटाईनमध्ये आहेत. तर युरोपात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर राणी एलिझाबेथ द्वितीय यांना बकिंगहम पॅलेसमधून विंडसर कॅसल येथे हलवण्यात आले होते.
Coronavirus: पाकिस्तानकडून एअर इंडियाच्या पाठीवर शाबासकीची थाप
ब्रिटनमध्ये आतापर्यंत ४७,८०६ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी ४,९४३ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावाचे मुख्य केंद्र झालेल्या अमेरिकेत गेल्या २४ तासांत १२०० लोकांचा मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्क शहरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत शहरातील तब्बल ६४, ९५५ लोकांना कोरोनाची लागण झाली असून २४७२ लोकांचा मृत्यू झाला आहे.