Body Shaming : महिला कर्मचाऱ्याला 'जाडी', 'वेश्या' म्हणणं बॉसला पडलं महागात, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड

Body Shaming : महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ करणं एका बॉसला महागात पडलं असून, कोर्टाने त्याला लाखोंचा दंड ठोठावला आहे. मात्र कोर्टाच्या आदेशानंतर बॉसने कंपनी बंद करत पाकिस्तानला पळ काढला आहे.  

Updated: Jan 18, 2023, 05:00 PM IST
Body Shaming : महिला कर्मचाऱ्याला 'जाडी', 'वेश्या' म्हणणं बॉसला पडलं महागात, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड title=

Body Shaming : कामाच्या तणावात अनेकदा मालकाकडून कर्मचाऱ्यांना अपमानजनक वागणूक दिली जात असते. अशावेळी कर्मचाऱ्यांवर ओरडणं, अपमानजनक भाषेत बोलण्याचे प्रकार घडत असतात. मात्र अशाच प्रकारे आपल्या महिला कर्मचाऱ्याचा (Female Employee) अपमान करणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. या अपमानासाठी मालकाला लाखो रुपये मोजावे लागले आहेत. 

नेमकं काय झालं?

कपड्याच्या दुकानात काम कऱणाऱ्या एका महिलेला १९ लाखांची नुकसान भरपाई दिली जाणार आहे. महत्त्वाचं म्हणजे हे पैसे तिच्या बॉसलाच द्यावे लागणार आहेत. याचं कारण म्हणजे बॉसने तिचा अपमान करताना काही अपशब्दांचा वापर केला होता. पीडित महिलेचं नाव आयशा जमान आहे. तिचा बॉस शहजाद युनूस याने तिला 'जाडी' आणि 'वेश्या' म्हटलं होतं. यानंतर तिने कोर्टात धाव घेतली होती. आयशाने खटला जिंकला आणि कोर्टाने शहजादला नुकसान भरपाई देण्यास सांगितलं.
 
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, खटला हारल्यानंतर शहजाद युनूसने कंपनी विकली आणि पाकिस्तानला पळून गेला. हे प्रकरण स्कॉटलंडचं आहे. शहजादने आयशाला गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात पैसे देतो असं सांगितलं होतं. पण हे पैसे अजूनही मिळालेले नाहीत. 

शहजादने आयशाला 'जाडी' म्हणत आपल्याला ऑफिसमध्ये 'बारीक आणि स्मार्ट मुली हव्यात' असं म्हटलं होतं. आयशा रात्री डीजेचं काम करत होती. याचा उल्लेख करताना शहजादने तिला हे वेश्याचं काम असल्याचं म्हटलं होतं.  तो नेहमी आयशाला अश्लील फोटो पाठवायचा. तसंच अनेकदा त्याने तिला बलात्काराची धमकीही दिली होती. 

आयशाला स्वत:च्या खिशातून करावा लागला खर्च

न्यायाधीशांनी आयशाचं शोषण केल्याप्रकरणी शहजाद आणि त्याच्या कंपनीला जबाबदार धरलं. मात्र यानंतर तीन महिन्यातच कंपनी बंद झाली. शहजाद पळून पाकिस्तानला गेल्याचं बोललं जात आहे. 

शहजादकडून पैसे वसूल करणं पोलिसांना शक्य नाही. कायदेशीर प्रक्रियेत आयशाला स्वत:च्या खिशातून जवळपास १० लाख रुपये खर्च करावे लागले आहेत. आपण दिवसरात्र मेहनत करुन कमावलेले सर्व पैसे खर्च झाल्याचं तिने सांगितलं आहे. हे प्रकरण आपण अजून पुढे नेलं असतं, पण आता आपल्याकडे पैसे नसल्याचं तिने म्हटलं आहे. शहजाद सध्या पाकिस्तान आणि बुडापेस्टमधून आपला व्यवसाय चालवत आहे.