Court Verdict Punishment To Man: पाकिस्तानमधील कराचीतील एका सत्र न्यायालयाने एका दुर्मीळ प्रकरणामध्ये विचित्र शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेल्या व्यक्तीला चाबकाचे 80 फटके देण्याचे आदेश दिले आहेत. या व्यक्तीने आपल्या पत्नीवर व्याभिचाराचा आरोप लावून स्वत:च्याच पोटच्या पोरीला नाकारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी ही व्यक्ती कायदेशीर सुनावणीनंतर दोषी आढळली.
अतिरिक्त जिल्हा न्यायालय तशा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती मलिर शेहनाज बोह्यो यांनी आरोपी फरीद कादिरला किमान 80 चाबकाचे फटके मारले जावेत अशी शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने दिलेल्या आदेशामध्ये, "या प्रकरणात जो कोणी शिक्षेस पात्र असेल त्याला चाबकाचे 80 फटके मारले जावेत," असं म्हटलं होतं. कोर्टाने निकाल देताना असंही सांगितलं की दोषसिद्ध झाल्यानंतर फरीद कादिरने सादर केलेले साक्षीदार आणि पुरावे कोणत्याही कोर्टामध्ये स्वीकारले जाणार नाहीत, असंही आवर्जून नमूद केलं.
समोर आलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील मुख्य आरोपी फरीद कादिरची पूर्वीश्रमीच्या पत्नीने कोर्टात दाखल केलेल्या याचिकेमध्ये, तिचं लग्न 2015 साली झालं होतं. लग्नानंतर मी किमान महिनाभर फरीदबरोबर वास्तव्यास होते. त्यानंतर डिसेंबर 2015 मध्ये मी एका मुलीला जन्म दिला, असं सांगितलं आहे. "माझा पती आमच्या पालनपोषणाची जबाबदारी उचलण्यास तसेच आमच्या बाळाची जबाबादारीही स्वीकारली नाही. तसेच तो आम्हाला पुन्हा घरी नेण्यासही असमर्थ ठरला. मी कौटुंबिक न्यायालयामध्ये या प्रकरणी तक्रार दाखल केली. माझ्या बाजूने निकाल लागला. कोर्टाने फरीदला माझ्या मुलीच्या आणि माझ्या पालनपोषणाची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले," असं या पीडित महिलेने कोर्टाला सांगितलं.
"मात्र माझ्या पतीने या कालावधीमध्ये कोर्टात दोन निवेदनं सादर केली. ज्यामध्ये मुलीची डीएनए चाचणी करण्याची आणि मुलीला न स्वीकारण्याची परावनगी द्यावी अशा मागण्या केल्या. नंतर फरीदने ही निवेदनं मागे घेतली," असं या महिलेने सांगितलं आहे. दुसरीकडे आरोपी फरीदने आपल्या पूर्वीश्रमीच्या पत्नीने केलेले आरोप मान्य करण्यास नकार दिला. आपण पत्नीसोबत केवळ 6 तास वेळ घालवला. "मी आणि माझी पत्नी केवळ सहा तास एकत्र राहिलो. त्यानंतर ती तिच्या माहेरी निघून गेली आणि पुन्हा कधीच परत आली नाही," असा दावा फरीदने केला आहे.
पाकिस्तानमध्ये चाबकाचे 80 फटके मारण्याची प्रथा ही 70 च्या दशकानंतर जिया उल हकच्या कालावधीनंतर फारशी वापरली जात नाही. "वकील म्हणून मागील 14 वर्षांच्या सेवेदरम्यान मी कधीच अद्यादेशच्या कलम 7 नुसार शिक्षा सुनावण्यात आल्याचं ऐकलं नव्हतं," असं या प्रकरणातील महिला वकील असलेल्या सायरा बानो यांनी म्हटलं आहे. "चाबकाचे फटके मारण्याची ही प्रथा मागील अनेक दशकांपासून शारीरिक दंडाच्या स्वरुपात देण्यात आलेली आपल्या पद्धतीची पहिलीच घटना आहे," असंही सायरा बानो म्हणाल्या.