Afghanistan Crisis : पाहा तालिबानच्या सत्तेत महिन्याभरातच अफगाणिस्तानची ही काय अवस्था?

तेथील नागरिकांप्रती अनेकांनी सहानुभूतीची भावना व्यक्त केली आहे.

Updated: Sep 15, 2021, 08:10 AM IST
Afghanistan Crisis : पाहा तालिबानच्या सत्तेत महिन्याभरातच अफगाणिस्तानची ही काय अवस्था?
छाया सौजन्य- रॉयटर्स

काबूल : जवळपास महिन्याभरापूर्वी काबूल (Kabul) ताब्यात घेत अफगाणिस्तानमध्ये तालिबाननं (Taliban) सत्ता प्रस्थापित केली होती. जवळपास चार दशकांची युद्धजन्य परिस्थिती आणि दहा हजारहून अधिक नागरिकांच्या मृत्यूनंतर देशातील सुरक्षा व्यवस्थेत बरेच बदल झाले. अफगाणिस्तानचं (Afghanistan) आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडून गेलं. 

जागतिक अन्न उपक्रमातर्फे या महिन्याअखेरपर्यंत अफगाणिस्तानात अनेक भूकबळी जाण्याची आणि अन्नाचा मोठा तुटवडा जाणवण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. अफगाणिस्तानात महिलांना त्यांचे हक्क मिळणार असल्याची हमी तालिबाननं दिली खरी, पण इथं प्राथमिक स्तरावरच सध्या जगण्याचा मोठा संघर्ष सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. 

काबुलमधील रहिवाशांच्या तोंडून, इथं प्रत्येक मुल भुकेलं आहे. इथल्या घरांमध्ये शिजवण्यासाठी पिशवीभर पीठ किंवा साधं तेलही नाही अशी करुण कथा ऐकण्यास मिळत आहे. अफगाणिस्तानातील बँकांबाहेर लांबच लांब रांगा दिसत आहेत. अनेकांनी पैसे मिळवण्यासाठी घरातील सामानाची विक्री करण्यास सुरुवात केली आहे. पण, या सामानाला विकत घेणाऱ्यांचाही इथं तुटवडा जाणवू लागला आहे. मागील वर्षीच्या जुलै महिन्यापासून अफगाणिस्तानात अनेक सरकारी कर्मचाऱ्यांना वेतनापासून वंचित राहावं लागलं आहे. परिणामी इथं नोकरदार वर्ग सुरक्षित नसल्याचं स्पष्ट होत आहे. 

दर दिवशी इथं जगण्याचा संघर्ष सुरु असून परिस्थिती दिवसागणिक आणखी वाईटच होत चालली असल्याची दाहक वस्तूस्थिती नागरिकांनी समोर आणली आहे. देशात सध्या युद्धजन्य परिस्थिती दिसत नाहीये, पण यासोबतच देशातील आर्थिक स्थैर्यही दिसेनासं झाल्याचं म्हणत येथील नागरिक परिस्थिती केव्हा सुधारेल याकडेच डोळे लावून बसले आहेत.