जरुसलेम : इस्राईलच्या सरकारचा कार्यकाळ संपत आला आहे. पण कार्यकाळ संपण्याच्या ७ महिन्या आधीच निवडणुकीची घोषणा झाली आहे. एप्रिलमध्ये मध्यावधी निवडणुका होणार आहे. याआधी पहिलं ओपिनियन पोल जाहीर झाला. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू पुन्हा एकदा सत्तेत येण्याची शक्यता आहे. इस्राईलमधील वृत्तपत्र मारीवने प्रकाशित केलेल्या पेनल्स पॉलिटिक्समध्ये नेतन्याहू पुन्हा पंतप्रधान होणार असं दिसतं आहे. लिकुद पक्षाला १२० पैकी ३० जागा मिळू शकतात. या पक्षाकडे आताही इतक्याच जागा आहेत.
माजी लष्कर प्रमुख बेन्नी गांत्ज यांच्या पक्षाला १३ जागा मिळण्याची शक्यता आहे. हा पक्ष दूसऱ्या स्थानी राहू शकतो. बेन्नी यांच्या पक्षाचं नाव अजून जाहीर झालेलं नाही. ते निवडणुका लढवणार की नाही याबाबत देखील अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
भ्रष्टाचाराच्या आरोपांचा सामना करणारे नेतन्याहू यांनी सोमवारी एप्रिलमध्ये निवडणुकीची घोषणा केली. त्यांच्याविरोधात भ्रष्टाराचा आरोप करण्यात आला आहे. याची चौकशी देखील सुरु आहे. स्थानिक वृत्तपत्रांच्या माहितीनुसार २ आणि ९ एप्रिलला निवडणुका होऊ शकतात.