ढाका : केरणीगंज येथील हजरतपूर पुलाजवळ सोमवारी स्थानिक लोकांना एक मृतदेह सापडला, त्यांनी तत्काळ पोलिसांना कळवलं असता पोलिसांनी लगेच घटना स्थळी धाव घेतली. पोलिसांनी विचारपुस केली असता हा मृतदेह प्रसिद्ध अभिनेत्राचा असल्याचे लक्षात आले आणि त्यानंतर त्यांनी तिच्या घरच्यांना बोलावून मृतदेहाची ओळख पटवून घेतली. यानंतर मृतदेह पोस्ट मॉर्टमसाठी पाठवला. या प्रकरणी पोलिसांनी संशयीत म्हणून अभिनेत्रीच्या नवऱ्याला ताब्यात घेतलं आहे.
बांगलादेशी अभिनेत्री रायमा इस्लाम शिमू ढाक्याच्या बाहेरील भागात मृतावस्थेत आढळून आली. केरणीगंज येथील हजरतपूर पुलाजवळ सोमवारी तिचा मृतदेह एका गोणीत सापडला होता. रायमा बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी रविवारी कलाबागन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
त्यानंतर स्थानिक लोकांच्या माहितीवरून पोलीस पथकाने केराणीगंज मॉडेल स्टेशन येथे एक मृतदेह मिळाला. त्याची खात्री केल्यानंतर हा मृतदेह अभिनेत्री रायमा इस्लाम शिमूचा आहे असे सांगण्यात आले आहे.
मृतदेह पोस्टमार्टमसाठी सर सलीमुल्ला मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये (एसएसएमसीएच) पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी ढाक्यातील केरानीगंजमधील आलियापूर भागातील हजरतपूर पुलाजवळ रस्त्याच्या कडेला मृतदेह आढळून आला. मृतदेह एका गोणीत ठेवण्यात आला होता. या गोष्टीची माहिती स्थानिक लोकांनी पोलिसांना दिली. अभिनेत्रीच्या मानेवरही खुणा होत्या. या प्रकरणी पोलिसांनी अभिनेत्रीचा पती आणि त्याच्या मित्रासह सहा जणांना ताब्यात घेतले आहे.
रायमा ढाक्यातील ग्रीन रोड येथे राहत होती. कुटुंबात पती आणि दोन मुले आहेत. रविवारी सकाळी ती शूटिंगसाठी घरून निघाली होती, मात्र संध्याकाळी उशिरापर्यंत ती परतली नाही. यानंतर कुटुंबीयांनी कलाबागन पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
35 वर्षीय अभिनेत्रीने 1998 मध्ये 'बर्टमन' या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. तिने एकूण 25 चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्या बांगलादेश फिल्म आर्टिस्ट असोसिएशनच्या सदस्याही होत्या. चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी टीव्ही नाटकांमध्येही अभिनय केला आणि निर्मिती देखील केली आहे.